यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल पंचायत समितीत सोमवारी झालेल्या पाणीटंचाईच्या आढावा बैठकीत आमदार अमोल जावळे आणि आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. कार्यालयात बसून अहवाल तयार करण्याऐवजी गावागावांत जाऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घ्या, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. बैठकीला दोन ग्रामसेवक गैरहजर असल्याने गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांनाही आमदारांनी धारेवर धरले.
बैठकीत तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला. यावेळी तालुक्यात पावसाची टक्केवारी ७९ टक्के असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, आमदारांना सादर केलेल्या पत्रातील पावसाची आकडेवारी आणि बैठकीतील माहितीमध्ये विसंगती असल्याचे निदर्शनास आले. तसेच, सध्या तालुक्यात कुठेही पाणीटंचाई नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता राजेंद्र गिरी यांनी सांगितले.
दरम्यान, शिरसाड, हंबर्डी आणि दहिगाव या गावांमध्ये यंदा पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता ग्रामसेवकांनी व्यक्त केली. प्रशासनाकडून सादर करण्यात आलेला अहवाल आणि ग्रामसेवकांनी दिलेली माहिती यात तफावत दिसून आल्याने दोन्ही आमदारांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, दोन ग्रामसेवक गैरहजर असल्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना जाब विचारत अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीला तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी अरुण पवार, बाजार समितीचे माजी उपसभापती बबलू कोळी, माजी सभापती नारायण चौधरी, सूर्यभान पाटील, भाजप तालुकाध्यक्ष सागर कोळी, नगरपालिकेच्या भाजप गटनेत्या नंदाताई महाजन, भरत चौधरी यांच्यासह ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, सरपंच, सदस्य आणि प्रशासक उपस्थित होते.
मात्र, यापूर्वीच्या आढावा बैठकीप्रमाणेच यावेळीही ठोस प्रश्न मार्गी लागले नसल्याची नाराजी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी व्यक्त केली.



