Home क्राईम मुक्ताईनगरातून चोरीला गेलेले तवेरा वाहन अमरावतीत सापडले ; एक आरोपी अटकेत

मुक्ताईनगरातून चोरीला गेलेले तवेरा वाहन अमरावतीत सापडले ; एक आरोपी अटकेत

0
8

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरातील अक्सानगर परिसरातून चोरीस गेलेल्या तवेरा वाहनाचा शोध घेण्यात मुक्ताईनगर पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे भुसावळ, शेगावमार्गे अमरावतीपर्यंत तपासाची चक्रे फिरवून पोलिसांनी चोरीस गेलेले वाहन अमरावती शहरातील नवसारी परिसरातून शोधून काढले. या प्रकरणी मोहम्मद मुद्दसिर मोहम्मद युनूस (वय २८, रा. अकोला, सध्या अमरावती) याला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९ वाजेपासून ते ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान मुक्ताईनगर शहरातील अक्सानगर परिसरातून तेवरा कंपनीचे MH-19/BC-0092 क्रमांकाचे वाहन अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. याप्रकरणी वाहनधारक शेख दानिश शेख साबीर यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि मुक्ताईनगर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी आपल्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदारांचे विशेष तपास पथक स्थापन करून त्यांना आवश्यक सूचना दिल्या. या पथकाने सर्वप्रथम घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तसेच स्थानिक नागरिकांकडून माहिती संकलित केली. सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणातून चोरीस गेलेले वाहन मुक्ताईनगरहून भुसावळच्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत भुसावळ, कुन्हा पानाचे, जामनेर, पहूर, सिल्लोड आणि खामगाव येथील प्रमुख रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.

वाहनाचा माग काढत पोलीस पथक शेगाव शहरापर्यंत पोहोचले. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चोरीस गेलेले वाहन श्री गजानन महाराज संस्थानच्या पार्किंग परिसरात सुमारे पाच तास उभे असल्याचे आढळून आले. त्यानंतर शेगाव शहरातून बाहेर पडणाऱ्या प्रमुख मार्गांवरील फुटेज तपासण्यात आले. या तपासातून संबंधित वाहन अमरावती शहरात प्रवेश करत असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, अमरावती शहरातून बाहेर जाणाऱ्या मार्गांवरील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे वाहन आढळून आले नाही. त्यामुळे पोलिसांनी अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या स्थानिक पोलिसांची मदत घेतली. अभिलेखावरील गुन्हेगारांची चौकशी आणि उपलब्ध माहितीच्या आधारे वाहनाचा शोध सुरू ठेवण्यात आला. अखेर अमरावती शहरातील नवसारी परिसरात एका ठिकाणी चोरीस गेलेले तेवरा वाहन उभे असल्याचे पोलिसांना आढळले.

वाहन सापडल्यानंतर पोलिसांनी त्यावर पाळत ठेवली. काही वेळाने मोहम्मद मुद्दसिर मोहम्मद युनूस हा संबंधित वाहनात बसलेला दिसून आला. त्याचे वय २८ वर्षे असून, तो मूळचा उत्तमचंद प्लॉट, तारफाईल, अकोला येथील रहिवासी आहे. सध्या तो पॅराडाईज कॉलनी, वलगाव रोड, नवसारी, अमरावती येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पाळत ठेवून असलेल्या पथकाने तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान ताब्यात घेतलेल्या व्यक्तीविरुद्ध अकोला शहरासह आसपासच्या परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगरमधील वाहन चोरीच्या गुन्ह्याशी संबंधित बाबींचा तसेच इतर संभाव्य संबंधांचा तपास पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत पोलीस हेड कॉन्स्टेबल कल्पेश आमोदकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल असिम तडवी, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश महाजन, रितेश चव्हाण, स्वप्निल पवार आणि अक्षय वाढे यांनी सहभाग घेतला. सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने मागोवा घेत अनेक शहरांमधून तपास पुढे नेल्याने चोरीस गेलेले वाहन शोधण्यात पोलिसांना यश मिळाले.


Protected Content

Play sound