यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । युवकांमध्ये वाढणाऱ्या व्यसनाधीनतेला आळा घालून निरोगी आणि व्यसनमुक्त समाजाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने ‘व्यसनमुक्ती अभियान’ अंतर्गत मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना व्यसनांचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच समाजातील इतर तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. एस. आर. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. संतोष जाधव उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार होते. प्रमुख वक्ते प्रा. डॉ. संतोष जाधव यांनी युवकांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनतेच्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली. अमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे मानवी शरीराचे शारीरिक आरोग्य बिघडण्यासोबतच मानसिक आणि बौद्धिक क्षमतेवरही गंभीर परिणाम होतात, असे त्यांनी स्पष्ट केले. व्यसनांमुळे व्यक्तीच्या जीवनावर तसेच कुटुंबावर आणि समाजावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देत त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी केवळ स्वतः व्यसनमुक्त राहणे पुरेसे नसून समाजातील इतर तरुणांनाही व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे डॉ. जाधव यांनी सांगितले. यासाठी विद्यार्थ्यांनी ‘नशामुक्त मित्र’ म्हणून भूमिका बजावावी, व्यसनांविषयी जनजागृती करावी आणि आपल्या मित्रपरिवारात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात तरुण पिढी ही देशाची खरी संपत्ती असल्याचे नमूद केले. युवकांचे आरोग्य, विचार आणि भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी व्यसनमुक्तीला विशेष महत्त्व आहे. व्यसनमुक्ती ही केवळ सामाजिक चळवळ नसून प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव निर्माण करणारी महत्त्वाची चळवळ असल्याचे सांगून, स्वयंसेवकांनी अशा समाजोपयोगी अभियानांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रा. खैरनार यांनी केले. व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी युवकांनी स्वतः जागरूक राहून इतरांनाही जागरूक करावे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. व्ही. पावरा यांनी केले. सहायक कार्यक्रम अधिकारी सी. टी. वसावे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्राध्यापिका रुपाली शिरसाठ यांनी उपस्थितांचे आभार मानले. या मार्गदर्शनपर व्याख्यानाला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे एकूण ६३ स्वयंसेवक उपस्थित होते.



