Home Cities जळगाव वीर गुर्जर सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी तुषार चव्हाण; पुरुषोत्तम महाराज पाटील यांची महाराष्ट्र...

वीर गुर्जर सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी तुषार चव्हाण; पुरुषोत्तम महाराज पाटील यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

0
42

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वीर गुर्जर सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी तुषार बाळासाहेब चव्हाण, जिल्हा उपाध्यक्षपदी विजय श्रीराम पाटील आणि जिल्हा सचिवपदी सुनील रतिलाल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांची वीर गुर्जर सेनेच्या आध्यात्मिक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पद्मालय शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे झालेल्या संघटनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यावेळी समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासह संघटनेचा विस्तार आणि समाजबांधवांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. एल. डी. चौधरी (निमकर) होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर समाजातील कौटुंबिक समस्या, बदलती सामाजिक परिस्थिती, कुटुंबातील नातेसंबंध आणि विवाहानंतर निर्माण होणारे मतभेद या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विवाहानंतर मुलाच्या वागणुकीत बदल झाल्याची तक्रार अनेक कुटुंबांमध्ये ऐकायला मिळते. मात्र, अशा परिस्थितीत कोणत्याही एका व्यक्तीला दोष देण्याऐवजी समस्येमागील कारणे समजून घेणे आवश्यक असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. विशेषतः सुनेला दोष देण्याची प्रवृत्ती टाळून आई-वडिलांनी मुलगा आणि सुनेच्या भावना समजून घ्याव्यात, तसेच कौटुंबिक प्रश्न संवादातून सोडविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

विवाहानंतर पती-पत्नीमध्ये निर्माण होणारे मतभेद आणि विभक्त होण्याच्या वाढत्या घटनांबाबतही उपस्थितांनी चिंता व्यक्त केली. मोबाईलचा अतिवापर, बदलती जीवनशैली आणि सामाजिक परिस्थितीचा कौटुंबिक नात्यांवर होणारा परिणाम यावर विचारमंथन करण्यात आले. कुटुंबव्यवस्था टिकविण्यासाठी परस्पर समजूतदारपणा, संयम, संवाद आणि नात्यांप्रती जबाबदारीची भावना महत्त्वाची असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. समाजबांधवांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी ‘न्याय निवाडा मंडळ’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला. समाजातील व्यक्तींना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तक्रारींच्या निवारणासाठी प्रयत्न करणे आणि परस्पर संवादातून प्रश्न सोडविण्यास मदत करणे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे बैठकीतील चर्चेतून स्पष्ट झाले.

वीर गुर्जर सेनेचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी जिल्हा, तालुका, शहर आणि गावपातळीवर संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचेही ठरविण्यात आले. समाजातील अधिकाधिक बांधवांना संघटनेशी जोडणे, समाजाच्या प्रश्नांवर एकत्रितपणे काम करणे आणि विविध सामाजिक उपक्रमांना चालना देणे, यावर बैठकीत भर देण्यात आला. नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या बैठकीत वीर गुर्जर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील, राष्ट्रीय सचिव मंगल बी. पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा पत्रकार राजेंद्र पाटील (गाढोदेकर), हरिभाऊ गुर्जर (वढोदेकर), प्रफुल्ल नाना पाटील (वडनगरीकर), ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील (मनवेलकर), तुषार चव्हाण (बोरखेडेकर), अजय गुर्जर (झुरखेडेकर), विजय पाटील (दगडीकर), सुनील पाटील (विटनेरकर) यांच्यासह डॉ. एल. डी. चौधरी (निमकर) यांनी मनोगत व्यक्त केले. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संघटनात्मक एकजूट आणि सामाजिक प्रश्नांवर सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे विविध वक्त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी प्रफुल्ल नाना पाटील यांनी केले, तर मंगल बी. पाटील यांनी आभार मानले. बैठकीला समाजातील असंख्य बंधू-भगिनी उपस्थित होते.


Protected Content

Play sound