Home Cities अमळनेर अमळनेरमध्ये पाणीटंचाईने नागरिक त्रस्त ; महिलांचा हंडा मोर्चाचा इशारा

अमळनेरमध्ये पाणीटंचाईने नागरिक त्रस्त ; महिलांचा हंडा मोर्चाचा इशारा

0
8

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील जय मातादी नगर, पारधी वाडा आणि ताडेपुरा परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठ्याची समस्या कायम असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. आठ-आठ दिवसांआड केवळ एक तास आणि तोही कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याचा आरोप करत परिसरातील महिलांनी नगरपरिषद प्रशासनाला दोन ते तीन दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात हंडा मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महिलांनी दिला आहे.

जय मातादी नगर, पारधी वाडा आणि ताडेपुरा या भागांतील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, नियमित पाणीपुरवठा होत नसल्यामुळे दैनंदिन गरजांसाठी आवश्यक पाणी मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आठ दिवसांच्या अंतराने पाणी सोडले जात असल्याने उपलब्ध पाणी पुरवून वापरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यातच पाण्याचा दाब कमी असल्याने ठरावीक वेळेत पुरेसे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार आहे.

पाण्याची गरज भागवण्यासाठी काही नागरिकांना रात्रीच्या वेळी इतर ठिकाणांहून पाणी आणावे लागत आहे, तर काही रहिवाशांना टँकरद्वारे पाणी मागवण्याचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि श्रम खर्च होत असून, पर्यायी पाणीव्यवस्थेमुळे आर्थिक भारही वाढत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. घरातील स्वयंपाक, स्वच्छता आणि इतर दैनंदिन कामांसाठी पाणी साठवून ठेवताना महिलांची विशेष धावपळ होत आहे.

या समस्येबाबत नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे तसेच संबंधित व्हॉल्वमनकडे वारंवार तक्रारी केल्याचे सांगितले. मात्र, तक्रारी करूनही पाणीपुरवठ्यात सुधारणा झालेली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. मूलभूत सुविधांपैकी एक असलेल्या पाण्याच्या प्रश्नाकडे अनेक महिन्यांपासून पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची नाराजीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, पाणीपुरवठ्याबाबत व्हॉल्वमन विकी महाजन यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. ‘तुम्हाला जे करायचे ते करा,’ असे उत्तर मिळाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या आरोपांबाबत संबंधित कर्मचाऱ्याची बाजू समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची वस्तुस्थिती तपासून प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.


Protected Content

Play sound