अडावद, ता. चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून स्वयंरोजगार सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. शासनाच्या लखपती दीदीसह विविध योजनांचा लाभ घेऊन कुटुंब, गाव, राज्य आणि देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी केले.
अडावद येथील क्षत्रिय माळी समाज सभागृहात ९ ऑक्टोबर रोजी सेवा संकल्प अभियानांतर्गत सातपुडा महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

आ. सोनवणे म्हणाले की, बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महिलांसाठी प्रत्येकी २० लाख रुपयांचे तीन सभागृह आणि दोन कोटी रुपयांचा महिला मार्ट मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत होणार आहे. महिलांनी मसाले, दशम्या, शेवया तसेच विविध खाद्यपदार्थ तयार करून त्यांचे ब्रँडिंग करावे आणि यशस्वी उद्योजक बनावे. तसेच मुलींच्या शिक्षणासाठी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना ग्रामीण भागात कोणते उद्योग सुरू करता येतील, याबाबत महिलांनी पुढाकार घेऊन सूचना कराव्यात, असे आवाहन केले. महिलांच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक उन्नतीसंदर्भातील शासकीय योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात जनजागृती करण्याची महत्त्वाची जबाबदारी महिलांवर असून, त्या आता शासनाच्या योजनांच्या ब्रँड ॲम्बेसेडर झाल्या आहेत, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र लोखंडे, चोपडा गटविकास अधिकारी अंजली बर्गे, सरपंच बबनखाँ तडवी, ग्रामविस्तार अधिकारी आर. डी. सैंदाने, ग्राम अधिकारी प्रमोद सैंदाने यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने रक्तदान शिबिर आणि महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. अडावद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पाटील आणि जिल्हा परिषद आरोग्य निरीक्षक विजय देशमुख यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि सातपुडा महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा रंजना भोई यांच्यासह शेकडो महिला बचत गट सदस्य उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी अंजली बर्गे यांनी केले. सूत्रसंचालन आधार पानपाटील यांनी केले, तर आभार जितेंद्र महाजन यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रामपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी आणि सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.



