Home आरोग्य दहिगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

दहिगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
11

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात १० ऑक्टोबर रोजी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मादाय रुग्णालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत कान, नाक, घसा तपासणी व सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ग्रामीण भागातील गरीब व गरजू रुग्णांना मोफत आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा शिबिराचा मुख्य उद्देश होता. यावेळी कानाचा पडदा फाटणे, कानातून पू येणे, ऐकू न येणे, नाकाच्या हाडांचे विकार, नाकात मांस वाढणे, सायनसचा त्रास, घशातील गाठी, टॉन्सिल्स, आवाजात बदल आणि गिळताना त्रास होणे अशा विविध समस्यांची तपासणी करण्यात आली. यासोबतच रक्तदाब, मधुमेह आणि सर्वसाधारण आरोग्य तपासणीही करण्यात आली.

शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची सखोल तपासणी करून त्यांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले. ज्या पात्र रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, त्यांच्या आयुष्मान भारत कार्डद्वारे जळगाव येथील रुग्णालयात नियमानुसार मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

या शिबिरात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या कान, नाक व घसा विभागातील डॉक्टर डॉ. विकास पवार, तसेच गोदावरी रुग्णालयातील होमिओपॅथिक डॉक्टर डॉ. सानिका राय आणि त्यांच्या नर्सिंग पथकाने सेवा दिली. शिबिराच्या यशस्वितेसाठी श्री गणेश आरोग्य सेवा, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी सहकार्य केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने यावल तालुक्यातील विविध गावांमध्ये पुढील आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. १३ ऑक्टोबर रोजी सावखेडा सीम, १५ ऑक्टोबर रोजी डोंगर कठोरा, २४ ऑक्टोबर रोजी कासारखेडा, तर २९ ऑक्टोबर रोजी शिरसाड व साकळी येथे शिबिरे होणार आहेत. या शिबिरांचा लाभ परिसरातील गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound