Home पर्यावरण स्मृतींच्या अंगणात रुजली हिरवाई ; प्रल्हाद गोळे यांच्या पुण्यानुमोदन विधीत वृक्षारोपणातून पर्यावरण...

स्मृतींच्या अंगणात रुजली हिरवाई ; प्रल्हाद गोळे यांच्या पुण्यानुमोदन विधीत वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

0
10

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दुःखद प्रसंगात दिवंगत व्यक्तीच्या स्मृती जपताना समाज आणि निसर्गाप्रती आपली बांधिलकी जपता येते, याचा प्रेरणादायी प्रत्यय मुक्ताईनगर तालुक्यातील सुळे येथे आला. सामाजिक कार्यकर्ते तथा प्रणिती मॅनपॉवर सर्व्हिसचे संचालक पप्पू गोळे यांचे वडील प्रल्हाद निनाजी गोळे यांच्या पुण्यानुमोदन विधीनिमित्त गोळे परिवाराने विविध जातींच्या वृक्षांची लागवड केली. या उपक्रमातून दिवंगत प्रल्हाद गोळे यांच्या स्मृतींना अनोखी मानवंदना देतानाच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

प्रल्हाद निनाजी गोळे यांचे शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते. त्यांच्या निधनामुळे गोळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या स्मृती चिरंतन जपण्याच्या भावनेतून परिवाराने पुण्यानुमोदन विधीच्या निमित्ताने वृक्षारोपणाचा विधायक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विविध जातींच्या वृक्षांची लागवड करून निसर्गाशी नाते जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘वृक्ष लावा, जीवन फुलवा’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. वृक्षारोपणामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते. तसेच भावी पिढ्यांसाठी हिरवाईचा वारसा निर्माण करण्याची संधी मिळते. दिवंगत व्यक्तीच्या स्मृती केवळ आठवणींत न ठेवता वृक्षांच्या रूपाने जिवंत ठेवण्याचा गोळे परिवाराचा हा प्रयत्न उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

या वेळी बौद्ध परंपरेनुसार पुण्यानुमोदन विधी श्रद्धा, करुणा आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पार पडला. छत्रपती संभाजीनगर येथील बुद्ध लेणीचे पूज्य भंतेजी महानाम यांना चिवरदान तसेच भोजनदान करण्यात आले. दानधर्माच्या माध्यमातून करुणा, मैत्री आणि मानवतेचा संदेश देण्यात आला. या प्रसंगी प्रल्हाद गोळे यांचा संपूर्ण परिवार, नातेवाईक, सहकारी आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपस्थितांनी दिवंगत प्रल्हाद गोळे यांच्या स्मृतींना अभिवादन करून गोळे परिवाराच्या दुःखात सहभाग नोंदविला आणि श्रद्धांजली अर्पण केली.


Protected Content

Play sound