Home प्रशासन तहसील मुक्ताईनगरमध्ये शेतपाणंद रस्त्यांच्या कामांना गती ; पुढील आठवड्यात वर्क ऑर्डर देणार!

मुक्ताईनगरमध्ये शेतपाणंद रस्त्यांच्या कामांना गती ; पुढील आठवड्यात वर्क ऑर्डर देणार!

0
16

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांना शेतशिवारात जाण्यासाठी पक्के आणि सोयीस्कर रस्ते उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील शेतपाणंद रस्त्यांच्या कामांना गती देण्यात येणार आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (९ ऑक्टोबर) मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या आढावा बैठकीत पुढील आठवड्यात रस्त्यांच्या कामांसाठी वर्क ऑर्डर देऊन प्रत्यक्ष कामे सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करण्यात आले. आतापर्यंत ७७ रस्त्यांपैकी २५ ते ३० रस्त्यांची मोजणी पूर्ण झाली असून, उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

या बैठकीला भुसावळचे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शेतपाणंद रस्त्यांच्या कामांची सद्यस्थिती, रस्त्यांची मोजणी, प्रशासकीय मान्यता आणि प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यासंदर्भात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामांमुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासकीय प्रक्रियेला गती देण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, शेतपाणंद रस्त्यांसंदर्भात आयोजित करण्यात आलेली ही दुसरी आढावा बैठक आहे. प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतशिवारात जाण्यासाठी योग्य रस्ता उपलब्ध व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. शासनाच्या बळीराजा पाणंद रस्ते योजनेच्या माध्यमातून शेतांपर्यंत पक्के रस्ते निर्माण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाच्या समन्वयातून प्रयत्न सुरू आहेत. रस्त्यांची मोजणी, प्रशासकीय मान्यता आणि कामांना प्रत्यक्ष सुरुवात या सर्व टप्प्यांतील अडचणी दूर करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. शेतपाणंद रस्त्यांच्या मोजणीसाठी एकूण ७७ रस्त्यांबाबत संबंधित विभागांना पत्र देण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत २५ ते ३० रस्त्यांची मोजणी पूर्ण झाली आहे. मात्र, संबंधित विभागांकडे आवश्यक मनुष्यबळ कमी असल्याने मोजणीच्या कामाला विलंब होत असल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केले. प्रांताधिकारी, मुक्ताईनगर व बोदवडचे तहसीलदार आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून उर्वरित रस्त्यांची मोजणी लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुढील आठवड्यात वर्क ऑर्डर देण्याचे नियोजन करण्यात आले असून, आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे शेतपाणंद रस्त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, कामांची प्रत्यक्ष सुरुवात संबंधित प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्यावर अवलंबून राहणार आहे. बैठकीत शेतरस्त्यांच्या रुंदीचा मुद्दाही महत्त्वपूर्ण ठरला. सध्या पारंपरिक शिवार रस्त्यांची रुंदी सव्वाआठ फूट असल्याचे नमूद करत आमदार पाटील यांनी आधुनिक शेतीच्या गरजांनुसार रस्ते अधिक रुंद असणे आवश्यक असल्याचे सांगितले. आज शेतीमध्ये ट्रॅक्टर, हार्वेस्टर आणि अन्य आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर वाढला आहे. त्यामुळे शेतात यंत्रसामग्री ने-आण करणे सुलभ व्हावे, वाहतुकीतील अडथळे कमी व्हावेत आणि शेतकऱ्यांचा वेळ व खर्च वाचावा, यासाठी शेतरस्त्यांची रुंदी १२ फूट करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतरस्त्यांच्या रुंदीबाबत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने या सूचना देण्यात आल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. शेतरस्ते अधिक रुंद झाल्यास आधुनिक कृषी यंत्रसामग्रीचा वापर सुलभ होईल. तसेच शेतमालाची वाहतूक अधिक सोयीस्कर होऊन उत्पादन खर्चात बचत आणि शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या बैठकीला मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे, बोदवडचे तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, मुक्ताईनगरच्या गटविकास अधिकारी कीर्ती कनवाडे, रावेरचे गटविकास अधिकारी विनोद मेढे, बोदवडचे गटविकास अधिकारी डी. जी. जाधव, वनविभागाच्या आरएफओ कृपाली शिंदे, भूमी अभिलेख अधिकारी वंदन जाधव, पंचायत समिती बांधकाम विभागाचे अभियंता दीपक भंगाळे आणि कृषी अधिकारी अभिजीत शिंदे यांच्यासह महसूल, कृषी, भूमी अभिलेख, वनविभाग आणि अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound