Home क्राईम तापी काठावर कॉपर चोरांचा धुमाकूळ; पाच जणांना रंगेहात पकडले !

तापी काठावर कॉपर चोरांचा धुमाकूळ; पाच जणांना रंगेहात पकडले !

0
6

वरणगाव, ता. भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कठोरा खुर्द परिसरात तापी नदीकाठावरील शेतांमध्ये चोरट्यांनी विद्युत मोटारी फोडून त्यातील तांब्याची तार चोरल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात एकूण आठ मोटारींमधील सुमारे 59 हजार रुपये किमतीची कॉपर वायर चोरीस गेल्याची फिर्याद वरणगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

कठोरा खुर्द येथील शेतकरी नारायण वासुदेव पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, तापी नदीकाठी त्यांचे शेत असून शेतीसाठी 10 हॉर्सपॉवरची विद्युत मोटार बसविण्यात आली आहे. परिसरातील अन्य शेतकऱ्यांच्याही विद्युत मोटारी याच भागात आहेत.

6 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पाटील हे शेतात पाणी देऊन घरी परतले. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात आल्यानंतर त्यांच्या मोटारीसह परिसरातील अन्य शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी फोडण्यात आल्याचे आणि त्यातील कॉपर वायर चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.

या घटनेत नारायण पाटील यांच्या 10 हॉर्सपॉवर मोटारीतील सुमारे 10 हजार रुपये किमतीची कॉपर वायर, तर यशवंत निवृत्ती पाटील, अशोक श्रीधर पाटील, संजय देविदास राणे, देविदास गोविंदा पाटील, शरद अशोक राणे, प्रमोद भास्कर पाटील आणि पंढरी अरुण पाटील यांच्या प्रत्येकी 7.5 हॉर्सपॉवर मोटारीतील सुमारे सात हजार रुपये किमतीची कॉपर वायर चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चोरीच्या मालाची एकूण किंमत 59 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, घटनेनंतर शेत परिसरात काल रात्री सव्वाआठच्या सुमारास गस्त घालत असताना काही जण त्यांना मोटारीतून कॉपरची चोरी करतांना आढळून आले. यात अजय बलवारी भिल, शिवा गणेश भिल, नितेश सुमलाल भिल, भोला सुमलाल भिल आणि अशोक रुपचंद भिल यांना रंगेहात पकडण्यात आले असून हे सर्व रावेर तालुक्यातील दसनूर येथील रहिवासी असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या सर्वांना पकडून वरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे काल रात्री वरणगाव पोलीस स्थानकात जमावाने आक्रमक भूमीका घेतली होती. वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांनी पोलीस स्थानकात जमावाची समजूत घातल्यानंतर वातावरण निवळले. तर, तापी काठावरील गावांमधील भुरट्या चोऱ्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आता करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound