Home क्राईम अपघातग्रस्त कारमधून तब्बल ५.९० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त ; दोन आरोपी अटकेत

अपघातग्रस्त कारमधून तब्बल ५.९० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त ; दोन आरोपी अटकेत

0
7

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अपघातग्रस्त चारचाकी वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार निंभोरा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. वडगाव फाट्याजवळ झालेल्या अपघातानंतर संशय आल्याने पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पदार्थ आढळून आले. या कारवाईत दोन तरुणांना अटक करण्यात आली असून, वाहनासह तब्बल ७ लाख ७० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ५.४५ वाजता निंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रावेर तालुक्यातील वडगाव फाट्याजवळ चारचाकी वाहनाचा अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सिल्व्हर गोल्ड रंगाच्या ह्युंदाई आय-१० कार क्रमांक MH-२६-V-४४२३ ने सोनालिका कंपनीच्या निळ्या रंगाच्या ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला होता. अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे यांच्यासह पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता तसेच सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन पोलिसांनी संबंधित चारचाकी, चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीला निंभोरा पोलीस ठाण्यात आणले.

त्यानंतर पंचांसमक्ष वाहनाची झडती घेण्यात आली. यावेळी वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विविध प्रकारचा गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. त्यामुळे अपघाताच्या घटनेसोबतच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक होत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. या प्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २१२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता-२०२३ मधील संबंधित कलमांसह अन्न सुरक्षा व मानदे कायदा, २००६ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत अजीम तैय्यब सय्यद (वय २३, रा. गारखेडा परिसर, धरतीधन सोसायटी, इंदिरा नगर क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर) आणि शेख मुहस्सिर कासिम (वय २३, रा. इंदिरा नगर, गारखेडा, आलमगीर मशीदजवळ, छत्रपती संभाजीनगर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या अवैध वाहतुकीमागील मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या विविध प्रकारच्या गुटखा व पानमसाल्याची किंमत ५ लाख ९० हजार ४४० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच ह्युंदाई कंपनीची आय-१० कार क्रमांक MH-२६-V-४४२३, अंदाजे १ लाख ८० हजार रुपये किमतीची, पोलिसांनी जप्त केली आहे. अशा प्रकारे एकूण ७ लाख ७० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेला गुटखा व पानमसाला नेमका कोठून आणण्यात आला होता, तो कोणाला पुरविला जाणार होता, या अवैध तस्करीचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि या साखळीत आणखी कोणकोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास निंभोरा पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या तपासातून प्रतिबंधित गुटखा वाहतुकीच्या मोठ्या साखळीचा पर्दाफाश होतो का, याकडे लक्ष लागले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक ढाकणे तसेच पोलीस कर्मचारी सतीश सानप, किरण जाधव, महेंद्र महाजन, परेश सोनवणे, प्रशांत चौधरी, अमोल वाघ आणि सफराज तडवी यांच्या पथकाने ही कारवाई केली.


Protected Content

Play sound