Home क्राईम तरुणीला पळवून नेल्याचा आरोप; आई-वडिलांना मारहाण, पिंपरुड-सावदा रस्त्यावर थरार

तरुणीला पळवून नेल्याचा आरोप; आई-वडिलांना मारहाण, पिंपरुड-सावदा रस्त्यावर थरार

0
34

सावदा ता. रावेर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील एका गावातील २४ वर्षीय तरुणीला तिच्या इच्छेविरुद्ध चारचाकी वाहनातून बळजबरीने पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (८ ऑक्टोबर) पहाटे पिंपरुड-सावदा रस्त्यावर घडल्याचा आरोप आहे. यावेळी तरुणीच्या आई-वडिलांनाही मारहाण करण्यात आल्याची तक्रार सावदा पोलिसांत दाखल झाली आहे. या प्रकरणी टेकचंद रविंद्र सरोदे (रा. रोझोदा, ता. रावेर) याच्यासह तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, संबंधित तरुणीचे यापूर्वी टेकचंद सरोदे याच्यासोबत लग्न झाले होते. मात्र, त्यानंतर ती आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. या प्रकरणासंदर्भात न्यायालयीन वाद सुरू असून, ८ ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होती. या सुनावणीसाठी तरुणी, तिचे वडील आणि आई हे तिघे मोटारसायकलवरून राहत्या गावाहून भुसावळकडे निघाले होते. पहाटे सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास पिंपरुड-सावदा रस्त्यावर स्मशानभूमीपासून काही अंतर पुढे वळणाजवळ त्यांच्या मोटारसायकलला मागून ग्रे रंगाच्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

धडकेनंतर चारचाकी वाहनातून तीन जण खाली उतरले. त्यापैकी दोघांनी चेहऱ्यावर काळे मास्क लावले होते, तर टेकचंद सरोदेचा चेहरा उघडा असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या तिघांनी स्प्रेच्या सहाय्याने तरुणी व तिच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर फवारणी केली. त्यामुळे तिघांना जळजळ होऊ लागली. त्यानंतर तरुणीला बळजबरीने चारचाकी वाहनात बसविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. तरुणीने विरोध केल्यावर तिला मारहाण करण्यात आली. मुलीला वाचविण्यासाठी तिच्या आईने हस्तक्षेप केला असता त्यांनाही चापट-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या झटापटीदरम्यान त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तुटून कुठेतरी पडल्याचेही फिर्यादीने सांगितले आहे.

दरम्यान, दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीला पकडून ठेवत मारहाण केली, तर टेकचंद सरोदे याने तरुणीला बळजबरीने कारमध्ये बसविल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर तिघेही वाहनात बसले आणि चालकाने कार पिंपरुडच्या दिशेने भरधाव नेऊन पलायन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घटनेनंतर फिर्यादी पत्नीसमवेत सावदा पोलीस ठाण्यात दाखल झाले. दोघांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गणेश पांडुरंग फड यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून तरुणीचा शोध घेण्याबरोबरच घटनेत वापरण्यात आलेले चारचाकी वाहन आणि अन्य संशयितांचा शोध घेतला जात आहे. फिर्यादीने वाहन तसेच चेहरा झाकलेल्या दोन्ही संशयितांना समोर आणल्यास त्यांची ओळख पटविण्याची तयारी दर्शविली आहे.


Protected Content

Play sound