अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेरच्या समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेला उजाळा देणारी यंदाची ‘शारदीय व्याख्यानमाला’ ११ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर तसेच प्रा. आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या व्याख्यानमालेत विविध क्षेत्रांतील नामवंत वक्ते, साहित्यिक आणि कलावंत रसिकांशी संवाद साधणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे दररोज सायंकाळी ६.३० वाजता व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवसांच्या या वैचारिक उपक्रमात अर्थकारण, निसर्ग, राष्ट्रवाद, कला आणि गझल अशा विविध विषयांची वैचारिक मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे. रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, साहित्यिक आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व डॉ. आशुतोष शराफ (मुंबई) यांच्या ‘नवरंग अर्थपूर्ण जीवनाचे’ या विषयावरील व्याख्यानाने व्याख्यानमालेचा शुभारंभ होणार आहे. अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवनाच्या विविध पैलूंवर ते मार्गदर्शन करणार आहेत.

सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध चित्रपट गीतकार, चरित्र अभिनेते, निसर्गकवी तसेच पटकथा-संवाद लेखक बाबासाहेब सौदागर (श्रीरामपूर) ‘हिरव्या ऋतूंचा रंगमहाल’ या विषयावर रसिकांशी संवाद साधतील. निसर्ग आणि मानवी जीवनातील नातेसंबंधांचे विविध पैलू त्यांच्या शैलीतून उलगडण्याची संधी यावेळी मिळणार आहे. मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा येथील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. डॉ. बालाजी चिरडे ‘लोकमान्य टिळकांचा शैक्षणिक राष्ट्रवाद’ या विषयावर विचार मांडणार आहेत. लोकमान्य टिळकांच्या शैक्षणिक विचारांचा आणि राष्ट्रवादाशी असलेल्या त्यांच्या संबंधांचा वेध या व्याख्यानातून घेतला जाणार आहे. बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते अतुल पेठे (पुणे) ‘जीवनात कला, कलते जीवन’ या विषयावर रसिकांशी संवाद साधतील. कला आणि जीवन यांच्यातील परस्परसंबंध तसेच कलात्मक दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहण्याची दृष्टी याबाबत ते आपले विचार मांडणार आहेत.
गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध गझलकार आणि पत्रकार प्रदीप निफाडकर (पुणे) यांच्या ‘गझलदीप — गझलेचा उर्दूतून मराठीकडे प्रवास’ या विषयावरील व्याख्यानाने व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे. गझलेची परंपरा, तिचा उर्दूतील प्रवास आणि मराठीतील झालेला विस्तार याचा साहित्यिक आढावा या निमित्ताने रसिकांना घेता येणार आहे. व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी खासदार स्मिता उदय वाघ, आमदार अनिल भाईदास पाटील, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर आणि उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



