Home आरोग्य जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जळगावात जनजागृती 

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जळगावात जनजागृती 

0
10

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांकडे त्यांच्या अडचणींपेक्षा त्यांच्या क्षमता आणि कौशल्यांच्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज अधोरेखित करत डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगावच्या न्यूरोफिजिओथेरपी विभागातर्फे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त विविध जनजागृतीपर आणि मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांचा सन्मान, स्वीकार आणि समाजातील समावेशकतेचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात यावर्षीच्या संकल्पनेच्या अनुषंगाने जनजागृतीपर भाषणाने झाली. सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांकडे केवळ त्यांच्या शारीरिक किंवा दैनंदिन अडचणींच्या चौकटीतून न पाहता, त्यांच्या अंगी असलेल्या क्षमता, सर्जनशीलता आणि कौशल्यांना योग्य संधी देणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. समाजातील प्रत्येक घटकाने अशा मुलांच्या क्षमतांना प्रोत्साहन देऊन त्यांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमात उडान केंद्रातील मुलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मुलांसाठी चित्रांना रंग भरणे, कोडी सोडवणे, ठोकळ्यांच्या साहाय्याने खेळ यांसह सूक्ष्म हालचालींना चालना देणारे विविध मनोरंजक उपक्रम घेण्यात आले. या उपक्रमांमधून मुलांना आनंद मिळण्यासोबतच त्यांच्या सर्जनशीलतेला आणि कार्यक्षमतेला चालना मिळाली. खेळाच्या माध्यमातून मुलांचा सहभाग वाढविणे आणि त्यांच्या क्षमतांना वाव देणे हा या उपक्रमांचा उद्देश होता. यावेळी सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांसाठी लवकर सुरू होणाऱ्या फिजिओथेरपी उपचारांचे महत्त्व पालकांना समजावून सांगण्यात आले. नियमित फिजिओथेरपी, योग्य व्यायाम, दैनंदिन सराव आणि पालकांचा सक्रिय सहभाग यामुळे मुलांच्या हालचाली, कार्यक्षमता आणि स्वावलंबनात सुधारणा होण्यास मदत होऊ शकते, याबाबत पालकांचे समुपदेशन करण्यात आले. मुलांच्या प्रगतीसाठी उपचारांसोबतच घरच्या पातळीवर सातत्याने सराव करणेही महत्त्वाचे असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सहभागी मुलांना लेखन साहित्याचे संच आणि चॉकलेट्स देण्यात आले. या छोटेखानी उपक्रमामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात डॉ. दिक्षिता बखतवाणी, सहाय्यक प्राध्यापक, तसेच पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. सानिका वाघमोडे आणि डॉ. मुघदा ठेंगरे यांनी सहभाग घेतला. सेरेब्रल पाल्सी असलेल्या प्रत्येक मुलामध्ये काही ना काही वैशिष्ट्यपूर्ण क्षमता असते. त्या क्षमतांचा सन्मान करून त्यांना योग्य प्रशिक्षण, उपचार आणि प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. अशा मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समान संधी मिळण्यासाठी कुटुंब, शैक्षणिक संस्था, आरोग्य क्षेत्र आणि समाजातील प्रत्येक घटकाने संवेदनशीलतेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमातून करण्यात आले.


Protected Content

Play sound