Home Cities जळगाव डिजिटल युगात स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी? प्रा. गोपाळ दर्जी यांचा मार्गदर्शन...

डिजिटल युगात स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी? प्रा. गोपाळ दर्जी यांचा मार्गदर्शन परिसंवाद

0
16

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील डॉ. वर्षा पाटील वुमेन्स व गोदावरी आयएमआर महाविद्यालयात “डिजिटल युगात स्पर्धा परीक्षेची तयारी” या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्याते प्रा. गोपाळ दर्जी यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमधील यश आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर यावर मोलाचे मार्गदर्शन केले. या विशेष उपक्रमामुळे उपस्थित विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी योग्य दिशा, आत्मविश्वास आणि नवी प्रेरणा मिळाली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. वर्षा पाटील वुमेन्स महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नीलिमा वारके आणि गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी प्रमुख मार्गदर्शक प्रा. गोपाळ दर्जी यांचे पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत केले. यानंतर उपस्थितांना संबोधित करताना प्रा. दर्जी यांनी विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षण घेत असतानाच मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, बदलत्या वेळेनुसार स्वतःला बदलणे आणि तंत्रज्ञानाची योग्य जोड देणे अत्यंत गरजेचे आहे, तरच आयुष्यात उत्तुंग यश मिळवता येईल.

आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात प्रा. दर्जी यांनी सांगितले की, स्वप्नांच्या वाटेत अनेक अडचणी येतात, परंतु प्रबळ इच्छाशक्ती आणि योग्य नियोजनाच्या जोरावर या अडचणींवर मात करता येते. ‘लाथ मारेल तिथे पाणी काढेल यालाच खरी स्पर्धा परीक्षा म्हणतात’ असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला. आजच्या डिजिटल युगात बँकिंगसह विविध क्षेत्रांमध्ये करिअरच्या अथांग संधी उपलब्ध असून शिस्त, बुद्धिमत्ता आणि सातत्य यांच्या बळावर यश संपादन करता येते, असा सल्ला त्यांनी दिला. या परिसंवादामुळे डॉ. वर्षा पाटील वुमेन्स महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींमध्ये स्पर्धा परीक्षांबद्दलचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन देवयानी महाजन यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


Protected Content

Play sound