Home धर्म-समाज सेवा संकल्प अभियान आणि वीरांगणा राणी दुर्गावती जयंतीनिमित्त आदिवासी महिला बचत गटांचा...

सेवा संकल्प अभियान आणि वीरांगणा राणी दुर्गावती जयंतीनिमित्त आदिवासी महिला बचत गटांचा भव्य मेळावा उत्साहात 

0
17

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या वतीने सेवा संकल्प अभियानाअंतर्गत तसेच वीरांगणा राणी दुर्गावती यांच्या जयंतीचे औचित्य साधून आदिवासी महिला बचत गटांच्या भव्य मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन ५ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा नियोजन कार्यालयात करण्यात आले. आदिवासी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांच्यातील उपजत कलागुणांना वाव देऊन त्यांना उद्योजकतेच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या मेळाव्यास परिसरातील शेकडो आदिवासी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने पार पडले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना आमदार राजूमामा भोळे यांनी स्पष्ट केले की, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक स्वावलंबन हीच खरी प्रगती आहे. कुटुंबाच्या व समाजाच्या सर्वांगीण विकासात महिलांचा सहभाग अत्यंत मोलाचा असून आदिवासी भागातील महिला बचत गटांनी केवळ बचतीपुरते मर्यादित न राहता विविध उत्पादन, प्रक्रिया उद्योग आणि व्यवसायांची कास धरली पाहिजे. शासन महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी कटिबद्ध असून विविध कल्याणकारी योजना व अनुदानाचा लाभ प्रत्येक पात्र महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. याच कार्यक्रमात १ जुलै २०२६ ते ३० जुलै २०२६ या कालावधीत नव्याने स्थापन झालेल्या बचत गटांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण करून प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

या मेळाव्यास जळगाव जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, आदिवासी विकास विभाग नाशिकचे उपआयुक्त राजेंद्र हिवाळे, उपजिल्हाधिकारी जितेंद्र कुवर, यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुनिलकुमार दोहरे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक ललित तावडे, सहायक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे, प्रवीण दाभाडे, मिनाक्षी सुलताने, संदीप पाटील, उमेदचे प्रकल्प अधिकारी हर्ष भोई तसेच कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र मुसळे, मिलींद पाईकराव आणि विश्वास गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शन सत्रादरम्यान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी महिला बचत गटांची कार्यपद्धती, अंतर्गत कर्जवाटप, हिशेब नोंदणी व व्यवस्थापन आणि ‘उमेद’ अभियानांतर्गत उपलब्ध असणाऱ्या संधींवर सविस्तर प्रकाश टाकला. महिलांनी गटबांधणीच्या माध्यमातून एकत्र येऊन स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करावा व पूरक उद्योग सुरू करावेत, असा सल्ला त्यांनी दिला. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुनिलकुमार दोहरे यांनी बँक लिंकेज, फिरता निधी, सवलतीच्या दरातील कर्ज आणि डिजिटल बँकिंग व्यवहारांविषयी तांत्रिक माहिती दिली. बचत गटांनी नियमित कर्जपरतफेड करून आपले क्रेडिट रेटिंग उत्तम ठेवावे, जेणेकरून मोठ्या व्यवसायांसाठी बँकेकडून अधिक भांडवल मिळणे सुलभ होईल, असे त्यांनी नमूद केले.

प्रास्ताविक करताना प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व सामूहिक योजनांची रूपरेषा मांडली. आदिवासी भागातील प्रत्येक गरजू महिला घटकाला स्वयंपूर्ण बनवणे हाच या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सहायक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे व प्रवीण दाभाडे यांनी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यालयाकडून पूर्ण सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही दिली. मेळाव्यात महिला प्रतिनिधींनी आपल्या अडचणी व अनुभव मांडले, ज्याचे उपस्थित मान्यवरांकडून तात्काळ निरसन करण्यात आले.

याच कार्यक्रमादरम्यान एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत येत असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये ‘सुंदर शाळा अभियान’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये शासकीय आश्रमशाळा मालोद (ता. यावल), लालमाती (ता. रावेर), अनुदानित आश्रमशाळा सत्रासेन (ता. चोपडा), सतखेडा (ता. धरणगाव) आणि शासकीय वसतिगृह रावेर (मुलांचे) व जळगाव नवीन (मुलींचे) यांना सन्मानित करण्यात आले.

सोबतच ‘राघोजी भांगरे गुणवंत विद्यार्थी पुरस्कार’ देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. इयत्ता १० वी शासकीय आश्रमशाळेतून विराज बारेला (देवझिरी – मुलांमध्ये प्रथम) व अरविना बारेला (वैजापूर – मुलींमध्ये प्रथम), तर अनुदानित आश्रमशाळेतून अमित पावरा (मेहुणबारे – मुलांमध्ये प्रथम) व पल्लवी वसावे (मेहुणबारे – मुलींमध्ये प्रथम) यांनी पुरस्कार पटकावला. १२ वी कला शाखेतून शासकीय आश्रमशाळेतील शकिल तडवी (वाघझिरा) व अर्पिता पावरा (वैजापूर), तर अनुदानित आश्रमशाळेतील करेश वळवी (मेहुणबारे) व रावता तडवी (कर्जाणे) प्रथम आले. १२ वी विज्ञान शाखेत शासकीय आश्रमशाळेतील निलेश बारेला (वाघझिरा) व अंकिता बारेला (वैजापूर), तर अनुदानित आश्रमशाळेतील तन्वीर पावरा (कर्जाणे) व रुपाली पावरा (पिंपळे) यांना गुणवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये मुख्याध्यापक रायभान सूर्यभान तायडे (पळासखेडा) व मनोज हिंमतराव ठाकरे (बोरगाव), अधिक्षक दिगंबर भिमराव पाटील (सोनबर्डी), मनोज पुंडलिक माळी (गुढे), अधिक्षिका चारुशिला प्रभाकर महाजन (दहिवद) व मंगला गोपाळ पाटील (सतखेडा), शिक्षक कृष्णा पुंजाजी ठाकरे (लालमाती) व रमाकांत पोपट कापडणिस (देवळी), वर्ग-४ कर्मचारी अनिल अंकुश हटकर (सोनबर्डी), भिकन ज्ञानेश्वर पाटील (कर्जाणे), संदिप युवराज तायडे (पाल) व मनोज रामलाल जोनवाल (प्रकल्प कार्यालय, यावल), एएनएम ललिता जयंतराव भारंबे (लालमाती), क्रीडा शिक्षक विशाल रमेश पाटील (चांदसर), गृहपाल अभिजित अनिल दिकोंडवार (नवीन मुलांचे वसतिगृह, जळगाव), सहायक लेखाधिकारी प्रविणकुमार वसंत रोकडे (प्रकल्प कार्यालय, यावल) आणि कनिष्ठ लिपिक विनोद नारायण पडोळे (प्रकल्प कार्यालय, यावल) यांचा समावेश होता.


Protected Content

Play sound