यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल परिसरातील शेती आणि भूजल पातळीचा विचार करता शेळगाव बॅरेजमध्ये यंदा पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आमदार अमोल जावळे यांनी तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक २ कडून बॅरेजमध्ये १०० टक्के पाणीसाठा करण्याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली आहे. या निर्णयामुळे आगामी काळात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होणार असून तापी नदीकाठच्या शेतीला सिंचनासाठी मोठा आधार मिळणार आहे.
शेळगाव बॅरेजचे काम पूर्ण झाल्यानंतर मागील सुमारे पाच वर्षांच्या कालावधीत विविध तांत्रिक व अन्य कारणांमुळे यात पूर्ण क्षमतेने पाणी साठवले जात नव्हते. प्रकल्प उभा राहूनही अपेक्षित पाणीसाठा होत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांना उपसा सिंचनाचा पूर्ण लाभ मिळत नव्हता, तसेच याचा थेट परिणाम परिसरातील विहिरी व कूपनलिकांच्या भूजलपातळीवर होत होता. यंदाच्या हंगामात भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईची भीषणता ओळखून उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्यात यावे आणि बॅरेज पूर्ण क्षमतेने भरावे, अशी आग्रही मागणी आमदार अमोल जावळे यांनी पत्राद्वारे पाटबंधारे विभागाकडे केली होती.

आमदार जावळे यांच्या पत्राची गांभीर्याने दखल घेत संबंधित प्रशासकीय विभागाने पाणीसाठा वाढवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्याच्या घडीला शेळगाव बॅरेज जलाशयातील पाण्याची पातळी १७७ मीटरवर पोहोचली असून, आगामी दिवसांत ती आणखी एक ते दोन मीटरने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बॅरेज पूर्ण क्षमतेने भरल्यास विस्तीर्ण जलसाठा निर्माण होऊन यावल व परिसरातील नदीकाठच्या हजारो एकर शेतीला उपसा सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल. तसेच, विहिरी आणि बोअरवेलच्या पुनर्भरण प्रक्रियेला मोठी गती मिळणार आहे.
आमदार अमोल जावळे यांच्या या पुढाकारामुळे तापी पाटबंधारे विकास महामंडळाने संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या असून क्षेत्रीय स्तरावर कार्यवाही गतीने सुरू आहे. मागील पाच वर्षांपासून प्रलंबित असलेला पूर्ण पाणीसाठ्याचा प्रश्न अखेर सुटण्याच्या मार्गावर असल्याने यावल तालुक्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यास सिंचनासोबतच परिसरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासही मोठी मदत होणार आहे.



