चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरात अवैध सावकारी करून कर्जदारांकडून अव्वाच्या सव्वा व्याजाची वसुली केल्याच्या आरोपांवरून पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. अवैध सावकारीविरोधात अवघ्या आठ दिवसांत तिसरा गुन्हा दाखल झाल्याने सावकारांमध्ये खळबळ उडाली आहे. कर्जाची मूळ रक्कम आणि व्याजाची परतफेड केल्यानंतरही अतिरिक्त पैशांची मागणी, दमदाटी, शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याच्या तक्रारींवरून चोपडा शहर पोलिसांनी दोन स्वतंत्र प्रकरणांत गुन्हे दाखल केले आहेत.
चोपडा शहर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक ४१०/२०२६ मध्ये भगवान शिवाजी पाटील (वय ४०, व्यवसाय दुग्ध व्यवसाय, रा. मजाक, ता. चोपडा) यांच्या तक्रारीवरून राकेश शामराव पाटील (वय ५०, रा. मोठा देव्हारा, दीपमाळ मंदिराजवळ, चोपडा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह सावकारी अधिनियमातील कलम ३९ व ४५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, भगवान पाटील हे म्हशी खरेदी करून दूध विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी १८ ऑक्टोबर २०२४ रोजी म्हशी खरेदी करण्यासाठी आरोपीकडून १० लाख ५० हजार रुपये रोख रक्कम उसनवारीने घेतली होती. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्यांनी घेतलेली मूळ रक्कम तसेच ठरलेले व्याज परत केल्यानंतरही आरोपीकडून अतिरिक्त व्याजाची मागणी सुरू होती. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, आरोपीने यापूर्वी ७७ लाख रुपयांच्या व्याजाची मागणी केल्याचा आरोप असून, तडजोडीनंतर ५० लाख रुपये व्याज देण्याची मागणी करण्यात आली. २९ जून २०२६ रोजी तक्रारदार आणि आरोपी यांच्यात बैठक होऊन देणे-घेणे शिल्लक नसल्याबाबत समझोता झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मात्र, त्यानंतरही अधिक रक्कम मिळवण्यासाठी तक्रारदाराला दमदाटी व अरेरावीची भाषा करण्यात आल्याचा आरोप आहे. या दबावामुळे तक्रारदाराने साक्षीदारामार्फत दीड लाख रुपये फोन-पेने आणि आणखी दीड लाख रुपये रोख दिले. अशा प्रकारे एकूण तीन लाख रुपये अतिरिक्त व्याजापोटी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतरही १५ जुलै २०२६ रोजी निर्मल डेअरी येथे आरोपीने तक्रारदाराच्या अंगावर धावून जात दमदाटी, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर ५ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ८.१५ वाजता आरोपीने पुन्हा फोन करून दीड लाख रुपयांच्या अतिरिक्त व्याजाची मागणी केली आणि रक्कम न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याचदरम्यान चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०९/२०२६ दाखल करण्यात आला आहे. शेख रफिक मो. हनिफ (वय ४१, व्यवसाय सलून, रा. मुस्तफा कॉलनी, चोपडा) यांच्या तक्रारीवरून शेख रशिद शेख बशिर, चेतन गोविंदराव पाटील, निरंजना चेतन पाटील, विजय बन्सी मिस्तरी आणि शबाना बी. शेख नाशिर बेग यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह सावकारी अधिनियमातील कलम ३९ व ४५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, २०२४ ते २०२५ या कालावधीत त्यांनी संबंधित व्यक्तींकडून व्याजाने पैसे घेतले होते. घेतलेली मूळ रक्कम आणि व्याजाची रक्कम ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात परत केल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, त्यानंतरही आरोपींकडून पुन्हा बेकायदेशीररीत्या पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, संबंधित व्यक्ती तक्रारदाराच्या सलून दुकानात तसेच मुस्तफा कॉलनीतील घरी जाऊन तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करीत, अंगावर धावून येत आणि मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप आहे. या तक्रारीवरून चोपडा शहर पोलिसांनी ५ ऑक्टोबर रोजी रात्री गुन्हा दाखल केला. चोपडा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध सावकारीविरोधात अल्पावधीत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याने या कारवायांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. यापूर्वीही अशाच प्रकारच्या सावकारी प्रकरणात एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे अवैध सावकारीचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
या पार्श्वभूमीवर चोपडा शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत देसले यांनी अवैध सावकारी करून नागरिकांकडून अवाजवी रक्कम वसूल करणाऱ्यांविरोधात पीडितांनी पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन केले आहे. तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास चोपडा शहर पोलिसांकडून सुरू असून, तक्रारींमध्ये करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी केली जात आहे. अवैध सावकारी, अतिरिक्त व्याजाची मागणी आणि कर्जदारांना धमकावण्याच्या प्रकारांविरोधात पोलिसांची कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.



