Home प्रशासन शेतकरी-पशुपालकांना मोठा दिलासा : तब्बल १४ वर्षांनंतर पालमध्ये पुन्हा भरणार गुरांचा बाजार

शेतकरी-पशुपालकांना मोठा दिलासा : तब्बल १४ वर्षांनंतर पालमध्ये पुन्हा भरणार गुरांचा बाजार

0
46

रावेर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पालयेथील बंद असलेला गुरांचा बाजार तब्बल १४ वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार असल्याने परिसरातील शेतकरी, पशुपालक आणि पशुधन व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकारातून मंगळवार, ६ ऑक्टोबर २०२६ पासून पाल उपबाजार आवारात दर मंगळवारी जनावरांची खरेदी-विक्री सुरू केली जाणार आहे.

पाल येथील गुरांचा बाजार २०१२ पासून बंद होता. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांना जनावरांची विक्री करण्यासाठी इतर बाजारपेठांचा आधार घ्यावा लागत होता. यामुळे वेळ, वाहतूक खर्च आणि श्रम वाढत होते. आता पालमध्येच बाजार सुरू होणार असल्याने ही गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

पाल येथील ग्रामीण रुग्णालयासमोरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात दर मंगळवारी गुरे-ढोरे तसेच शेळ्या-मेंढ्यांची खरेदी-विक्री करता येणार आहे. त्यामुळे पालसह परिसरातील गावांमधील पशुपालकांना आपल्या जनावरांसाठी स्थानिक पातळीवरच बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

बाजार सुरू झाल्याने शेतकऱ्यांना जनावरांची विक्री करण्यासाठी दूरच्या बाजारात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. त्याचबरोबर गुरे व्यापारी, शेळी-मेंढी व्यापारी आणि पशुधन खरेदी-विक्रीशी संबंधित व्यावसायिकांनाही पालमध्ये व्यवहाराची सुविधा उपलब्ध होणार आहे. बाजारामुळे स्थानिक पातळीवर पशुधनाच्या व्यापाराला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, परिसरातील शेतकरी, पशुपालक, गुरे व्यापारी, शेळी-मेंढी व्यापारी तसेच गुरे दलालांनी आपली जनावरे खरेदी-विक्रीसाठी पाल उपबाजार आवारात आणावीत आणि बाजार समितीच्या या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

गुरांचा बाजार पुन्हा सुरू करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रल्हाद पाटील, उपसभापती मनिषा पाटील, सचिव कमलेश पाटील तसेच संचालक मंडळाने पुढाकार घेतला आहे. १४ वर्षांपासून बंद असलेली बाजारपेठ पुन्हा सुरू होत असल्याने पाल परिसरातील पशुधन व्यवहाराला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound