Home Cities जळगाव जळगावात महाविकास आघाडीचा उद्या मोर्चा ; ईव्हीएम हटावसह शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख...

जळगावात महाविकास आघाडीचा उद्या मोर्चा ; ईव्हीएम हटावसह शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख मदतीची मागणी

0
13

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाविकास आघाडीच्या वतीने विविध मागण्यांसाठी उद्या, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा व धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून मोर्चाला सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.

नुकतीच दिल्ली येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीतील घटक पक्ष तसेच मित्रपक्षांच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे, समाजवादी पक्ष तसेच इतर मित्रपक्ष या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोर्चातील प्रमुख मागण्यांमध्ये ईव्हीएम हटाव, तसेच एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे. याशिवाय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली असून, त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रावर पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, ही देखील आंदोलनातील प्रमुख मागणी असणार आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाने तातडीने ठोस मदत जाहीर करावी, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे. मोर्चासाठी जळगाव शहर व जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते तसेच युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सर्वपक्षीय महाविकास आघाडीच्या अध्यक्षांकडून करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष विविध राजकीय, निवडणूक प्रक्रियेशी संबंधित आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दरम्यान, उद्या दुपारी १ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक/शिवतीर्थ मैदान परिसरातून मोर्चाला सुरुवात होणार असून, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करून निवेदन सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या या आंदोलनाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound