Home Cities जळगाव शिवसंवाद दौऱ्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली रायपूर ग्रामस्थांची भेट

शिवसंवाद दौऱ्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली रायपूर ग्रामस्थांची भेट

0
19

रायपूर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यात सध्या कोणत्याही निवडणुकांचा हंगाम नसताना देखील शिवसेना जनतेच्या दरबारी पोहोचली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गावागावांत जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसंवाद दौऱ्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी रायपूर ग्रामस्थांची भेट घेऊन दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी समजून घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

या जनसंवाद व ‘शिवसंवाद’ अभियानांतर्गत शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व लोकप्रतिनिधी गावोगावी भेटी देऊन थेट शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. सध्या वाढता दुष्काळ आणि पिकांचे झालेले नुकसान यामुळे ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण आहे. अशा वेळी केवळ निवडणुकांच्या काळातच नव्हे, तर इतर वेळीही शासन आणि पक्ष जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, हा संदेश देण्यासाठी हे पदाधिकारी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर आणि गावांमध्ये फिरत आहेत.

दौऱ्यादरम्यान रायपूरसह तरसोद, मन्यारखेडा, कुसूंबा,चिंचोली, कंडारी, उमाळा, धानवड आदी गावांमधील ग्रामस्थांशी चर्चा करून पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याची सोय, वीज समस्या आणि शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर माहिती गोळा केली जात आहे. या समस्यांचे संकलन करून ते थेट पालकमंत्री आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचा मानस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या प्रसंगी उप जिल्हाप्रमुख अनिल भाऊ भोळे, तालुकाप्रमुख शिवराज रावसाहेब पाटील, रमेश आप्पा पाटील, जितेंद्र पाटील, प्रवीण परदेशी, गजानन सोनवणे, चेतन पवार, अमोल पाटील यांच्यासह रायपूर गावातील शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांचे प्रश्न बारकाईने ऐकून घेतले असून, प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून ते लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन यावेळी दिले.


Protected Content

Play sound