चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन आणि पितृपक्षाचे औचित्य साधून मातोश्री यमुनाई वृद्धाश्रम, धानोरा येथे गरजू ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना विविध सहायक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभाग, भारत सरकार आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑक्टोबर रोजी हा उपक्रम राबविण्यात आला.
कॅ. आण्णासो नारायण पाटील बहुउद्देशीय संस्था, धानोरा संचलित या वृद्धाश्रमात आयोजित कार्यक्रमात व्हीलचेअर, टॉयलेट कमोड, काठी, मान, गुडघा आणि कंबरेचे पट्टे आदी साहित्याचे वितरण करण्यात आले. वृद्धापकाळात निर्माण होणाऱ्या शारीरिक अडचणी लक्षात घेऊन दैनंदिन हालचाली सुलभ व्हाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे अशासकीय सदस्य तथा इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे कार्य सदस्य मुकुंद गोसावी, केंद्रप्रमुख एस. पी. गणेशकर, संस्थेच्या अध्यक्ष उषाबाई रवींद्र पाटील, उपाध्यक्ष हुकूमचंद दत्तात्रय पाटील, वृद्धाश्रमातील कर्मचारी, नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.
मुकुंद गोसावी यांनी, “जिवंतपणी घरातील ज्येष्ठांची सेवा करणे हेच महापुण्यदायी कर्म आहे. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि सकारात्मक विचार माणसाचे जीवन समृद्ध करतात,” असे सांगितले. तर हुकूमचंद पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा अमूल्य ठेवा असून त्यांच्या आरोग्याची व गतिशीलतेची काळजी घेणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे नमूद केले.



