Home Cities जळगाव मनपाच्या महासभेत २६ विषयांवर होणार चर्चा; रस्ते, कचरा व्यवस्थापन, मालमत्ता कर अन्...

मनपाच्या महासभेत २६ विषयांवर होणार चर्चा; रस्ते, कचरा व्यवस्थापन, मालमत्ता कर अन् विकासकामे अजेंड्यावर

0
107

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील विविध विकासकामे, कर्मचारी प्रश्न, मालमत्ता कर, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते व गटारी, पथ विक्रेता योजना, वीज सुरक्षेसह शहरातील विविध महत्त्वाच्या विषयांवर महानगरपालिकेच्या आगामी महासभेत चर्चा होणार आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता महासभेचे आयोजन करण्यात आले असून, सभेच्या विषयपत्रिकेत तब्बल २६ विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

महासभेच्या सुरुवातीला मागील सर्वसाधारण महासभेच्या कार्यवृत्तास कायम करण्याचा विषय मांडण्यात येणार आहे. त्यानंतर महानगरपालिकेच्या चतुर्थश्रेणी कर्मचारी तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या जुलै भत्ता दराबाबत प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावावर निर्णय घेतला जाणार आहे. तसेच जैवविविधता समितीमधील सदस्यांच्या नावामध्ये दुरुस्ती करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा होणार आहे.

शहरातील सामाजिक उपक्रमांना चालना देण्यासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) सेल स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव महासभेत ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शहराच्या विकासकामांसाठी CSR निधीचा प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेची भूमिका काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.

शहरातील रस्ते व मूलभूत सुविधांशी संबंधित प्रस्तावांनाही महासभेत महत्त्व देण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक १३ मधील मोहाडी रोडवरील गुरु पेट्रोल पंप ते शिरसोली रोडपर्यंत रस्ता डांबरीकरणाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव आहे. तसेच प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत सिंधे नगर परिसरातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना आरसीसी गटार बांधण्याबाबतच्या प्रस्तावावरही निर्णय होणार आहे.

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतून जळगाव महानगरपालिका हद्दीत विकासकामे करण्यासाठी कामांची निश्चिती करण्याचा विषयही अजेंड्यावर आहे. यासोबतच नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजना आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत विकासकामांसाठी कामांची निश्चिती करण्याबाबत प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावांवर चर्चा केली जाणार आहे.

शहरातील घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रस्तावित कार्यपद्धती व नियमावली तसेच त्यामधील दंडात्मक तरतुदींना मान्यता देण्याचा विषयही महासभेत मांडण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना आणि दंडात्मक कारवाईची तरतूद केली जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.

जळगाव शहरातील मांस विक्री व्यवसायासाठी आकारण्यात येणारे शुल्क, परवाना व वार्षिक नूतनीकरण शुल्क तसेच परवाना नूतनीकरण न केल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या दरांमध्ये सुधारणा करून सुधारित दर निश्चित करण्याबाबतचा प्रस्तावही सभेत आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पथ विक्रेता योजना अंतिम करण्याबाबत प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावावरही निर्णय घेतला जाणार आहे.

महावितरणकडून तुटणाऱ्या धोकादायक विद्युत तारांबाबत धोरण ठरविण्याचा विषयही महासभेच्या अजेंड्यावर आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक वीज तारांचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने या विषयावर महासभेत काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.

महानगरपालिकेच्या मालमत्तांच्या मुद्रीकरणाबाबत महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या निर्णयानुसार महानगरपालिकेच्या मालमत्तांचा विनियोग, विकास व मुद्रीकरण करण्याबाबत तसेच यापूर्वी भाडेपट्ट्याने किंवा भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या मालमत्तांचे फेरसर्वेक्षण, पुनरावलोकन आणि लागू नियमानुसार भाडे व सुरक्षा ठेव पुनर्निर्धारण करण्याबाबतचा प्रस्तावही सभेसमोर ठेवण्यात आला आहे.

मोजे चिंचोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच Medical Hub आणि विभागीय क्रीडा संकुलास पाणीपुरवठा करण्याबाबतचा प्रस्तावही महासभेत मांडण्यात आला आहे. तसेच महानगरपालिकेच्या स्वनिधीत वाढ करून शासकीय व दीर्घकालीन महसूल स्रोत उपलब्ध करून देणे, आर्थिक क्षमता अधिक सक्षम करणे आणि उपलब्ध करआधाराचा विस्तार करण्याच्या दृष्टीने शहरातील Cricket Turf, Box Cricket Turf, Multi-Sports Turf, Sports/Recreation Facilities, Rooftop Hotel/Restaurant/Cafe आणि Commercially Used Terrace यांसारख्या व्यावसायिक वापराच्या जागांचे स्वतंत्र वर्गीकरण करून मालमत्ता कर निश्चित करण्याबाबतचा प्रस्तावही चर्चेसाठी आहे.

याशिवाय प्रभाग समितीच्या पुनर्गठनाबाबतचा प्रस्तावही महासभेत ठेवण्यात आला आहे. अशासकीय प्रस्तावांमध्ये विविध चौक, प्रवेशद्वार आणि सार्वजनिक ठिकाणांना महापुरुष व ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची नावे देण्याच्या मागण्यांचा समावेश आहे. शिवकॉलनी येथील प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’* असे नामकरण करण्याबाबतचा प्रस्ताव आहे.

नवलभाम परिसरातील जुन्या बॉम्बे लॉजसमोरील चौकाला मेहतर समाजाचे राष्ट्रीय संत ‘श्री नवलस्वामीजी महाराज चौक’, तर रेल्वे स्टेशन रोडवरील हॉटेल बॉम्बे जवळील चौकाला मेहतर समाजाचे वीर पुरुष ‘श्री रतनसिंगजी महाराज चौक’ असे नामकरण करण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. कांचन नगरातील सद्गुरू किराणा दुकानाजवळील चौकाला ‘जय जगदंबा चौक असे नामकरण करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा होणार आहे. प्रभाग क्रमांक १६ मधील जुन्या पाण्याच्या टाकीस ‘लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल अमृत जलकुंभ’ असे नामकरण करण्याचा प्रस्ताव आहे.

प्रभाग क्रमांक १८, सेक्टर एफ, नेक्सा शोरूम मागील दिव्य बॉम्बे नागरी दूध डेअरीजवळील चौकाला ‘छत्रपती संभाजी महाराज चौक’ असे नाव देण्याबाबतचा प्रस्तावही अजेंड्यावर आहे. तसेच लोकमान्य टिळक यांचा पुतळा जळगाव शहरात उभारण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्याबाबतही महासभेत चर्चा होणार आहे.

सी.एस.आर. निधीतून महानगरपालिका ओपन स्पेस विकसित करण्याबाबतचा प्रस्ताव, तसेच मनपा शाळा क्रमांक ४५ ची जागा जीवन विकास सामाजिक संस्थेस देण्याबाबतचा विषयही सभेत मांडण्यात आला आहे. याशिवाय महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ ते १९ मधील नगरसेवकांनी प्रस्तावित केलेल्या विविध विकासकामांना मंजुरी मिळण्याबाबतचा विषयही महासभेच्या अखेरच्या अजेंड्यावर आहे.


Protected Content

Play sound