Home प्रशासन आमोदा येथे शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन शिबिर 

आमोदा येथे शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन शिबिर 

0
16

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील आमोदा येथे शासनाच्या विविध योजना व सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजपा दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण पाटील (नायगावकर) यांच्या प्रयत्नातून आणि संतोष शिवलकर यांच्या आयोजनातून हे शिबिर घेण्यात आले.

शिबिरात दिव्यांगांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. दिव्यांगांसाठी भांडवल अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतच्या योजनेत २० टक्के सबसिडी, तसेच विविध महामंडळांच्या माध्यमातून उद्योजकांसाठी ३ ते ५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्ज योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. याशिवाय महिला व बालकल्याण विभागाच्या योजना, कामगार कार्यालयाच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधा, घरकुल योजना, दिव्यांग बचतगट, बालसंगोपन योजना तसेच सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठीच्या योजनांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अरुण पाटील यांनी केंद्रातील मोदी सरकार तसेच राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या विविध योजना गरजू आणि गरीब लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. दिव्यांग बांधवांचे सक्षमीकरण, बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील तळागाळातील गरजू महिला-पुरुष लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी आमदार अमोल हरीभाऊ जावळे सातत्याने प्रयत्न करीत असल्याचेही अरुण पाटील यांनी सांगितले. नागरिकांनी योजनांची माहिती घेऊन पात्रतेनुसार त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या शिबिरात विविध शासकीय योजनांसाठी तब्बल २० लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. यावेळी ‘माता भवानी दिव्यांग स्वयं सहायता बचत गट’ची स्थापना करण्यात आली. तसेच भाजपा फैजपूर मंडल भाजपा दिव्यांग आघाडीच्या अध्यक्षपदी संतोष एकनाथ शिवलकर यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याची माहिती अरुण पाटील यांनी दिली.

दिव्यांग बांधवांचे सक्षमीकरण करण्याबरोबरच भाजपा संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचे गावनिहाय संघटन वाढविण्यासाठी अशा प्रकारची मार्गदर्शन शिबिरे प्रत्येक गावात आयोजित करण्याचा निर्धारही अरुण पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी आमोदा येथील ऑनलाईन सेंटरचे निखिलभाऊ सपकाळे यांनी दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाला लक्ष्मण पाटील, राकेश शिवलकर, सुरेश चौधरी, सुनिता भंगाळे, चितामण सपकाळे, जिजाबाई शिवलकर, सुनिता चौधरी, मोहिनी पाटील यांच्यासह गावातील अनेक लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संतोष शिवलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Protected Content

Play sound