यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वन्यजीव सप्ताहानिमित्त यावल वन्यजीव अभयारण्यातील जामन्या वनक्षेत्रात पक्षी निरीक्षण, अभ्यास आणि निसर्ग भ्रमंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. चातक निसर्ग संवर्धन संस्था आणि यावल वन्यजीव अभयारण्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात पक्षीप्रेमी, वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी होत पक्ष्यांच्या अधिवासाची तसेच विविध पक्षी प्रजातींची ओळख व निरीक्षण याबाबत माहिती जाणून घेतली.
दरवर्षी २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहाच्या निमित्ताने वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन, वन्यप्राण्यांबाबत जनजागृती तसेच वन्यजीव आणि निसर्गाच्या महत्त्वाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. संरक्षित वन्यप्राणी व पक्षी घरात पाळण्यास प्रतिबंध करण्यासोबतच नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वन्यजीवांचे संरक्षण करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात येतो. याच अनुषंगाने ४ ऑक्टोबर रोजी यावल सातपुडा अभयारण्य क्षेत्रातील जामन्या येथे पक्षी निरीक्षण, अभ्यास आणि निसर्ग भ्रमंती कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी पक्षी तज्ज्ञ अनिल महाजन, तुषार पाटील आणि योगेश पाटील यांनी सहभागी झालेल्यांना विविध पक्ष्यांची ओळख, त्यांचे अधिवास, वर्तन आणि निरीक्षणाची पद्धत याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रम कृष्णा भवर, उपवनसंरक्षक, वन्यजीव, नाशिक आणि सत्यजित निकम, सहाय्यक वनसंरक्षक, यावल वन्यजीव अभयारण्य यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यावेळी अभयारण्यातील वनअधिकारी व कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेत वन्यजीव आणि पक्षी संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे नियोजन रूपेश कुमार दुसाने, वनपरिक्षेत्र अधिकारी, जामन्या वन्यजीव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी सर्व वनपरिमंडळ अधिकारी, वनरक्षक आणि संरक्षण मजूर उपस्थित होते. पक्षी निरीक्षणादरम्यान विविध पक्ष्यांच्या अधिवासाची वैशिष्ट्ये, पक्ष्यांची ओळख आणि त्यांच्या नैसर्गिक हालचालींचे निरीक्षण करण्यात आले.
निसर्ग भ्रमंतीदरम्यान सहभागी झालेल्यांनी अभयारण्यातील जैवविविधतेचा जवळून अनुभव घेतला. पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास सुरक्षित राहणे आणि वनक्षेत्राचे संवर्धन होणे यासाठी नागरिकांनीही निसर्ग व वन्यजीव संरक्षणाच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे वन्यजीव आणि पक्ष्यांविषयी अभ्यासपूर्ण माहिती मिळण्यासोबतच निसर्ग संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यावल वन्यजीव अभयारण्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



