Home Cities भुसावळ वरणगावला अप्पर तहसील कार्यालयाचा मार्ग मोकळा ; लवकरच मंजुरीची अपेक्षा

वरणगावला अप्पर तहसील कार्यालयाचा मार्ग मोकळा ; लवकरच मंजुरीची अपेक्षा

0
24

वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहर आणि परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची प्रशासकीय सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वरणगाव येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात आला असून, लवकरच शासनाची मंजुरी मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिल्याचे वरणगाव नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील रमेश काळे यांनी सांगितले.

वरणगाव शहराची वाढती लोकसंख्या तसेच परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांचा विचार करता महसूल विभागाशी संबंधित विविध कामांसाठी नागरिकांना सध्या भुसावळ येथे जावे लागते. यामुळे नागरिकांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. महसूल विभागाच्या सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध झाल्यास वरणगाव शहरासह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. याच पार्श्वभूमीवर वरणगाव येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीसाठी नगराध्यक्ष सुनील रमेश काळे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबई येथे भेट घेत पाठपुरावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही महसूल मंत्र्यांसोबतची तिसरी भेट होती. माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातूनही महसूल मंत्र्यांकडे वरणगाव येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती.

या मागणीची दखल घेत महसूल मंत्री बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना वरणगाव येथील अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित प्रस्ताव विभागीय स्तरावरून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यामुळे आता शासनाच्या अंतिम मंजुरीकडे वरणगावकरांचे लक्ष लागले आहे. महसूल विभागाशी संबंधित दाखले, विविध प्रशासकीय कामे आणि इतर सेवांसाठी नागरिकांना भुसावळला वारंवार जावे लागू नये, तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचा वेळ आणि आर्थिक खर्च वाचावा, या उद्देशाने अप्पर तहसील कार्यालयाची मागणी करण्यात आल्याचे नगराध्यक्ष काळे यांनी सांगितले. कार्यालय सुरू झाल्यास वरणगाव शहरासह लगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

वरणगाव येथे अप्पर तहसील कार्यालयासाठी पाठपुरावा करताना मुख्यमंत्री, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांचे सहकार्य लाभल्याचे सुनील काळे यांनी नमूद केले. या सर्वांच्या सहकार्यामुळे वरणगावच्या अप्पर तहसील कार्यालयाच्या मागणीला शासनस्तरावर गती मिळाल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. वरणगाव येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला शासनाकडून मिळालेला प्रतिसाद अभिनंदनीय असल्याचेही काळे यांनी सांगितले. वरणगावकर तसेच परिसरातील जनतेच्या प्रशासकीय गरजा लक्षात घेऊन नागरिकांच्या सेवेसाठी आपण सदैव तत्पर राहू, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.


Protected Content

Play sound