Home क्राईम रावेर पोलिसांची हातभट्टी दारूविरुद्ध धडक कारवाई ; ३४५ लिटर दारूसह ८१ हजारांचा...

रावेर पोलिसांची हातभट्टी दारूविरुद्ध धडक कारवाई ; ३४५ लिटर दारूसह ८१ हजारांचा मुद्देमाल नष्ट

0
32

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात अवैध हातभट्टी दारूची निर्मिती व विक्रीविरोधात रावेर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल नष्ट केला. तालुक्यातील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे ३४५ लिटर दारू तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे गूळ-मोह मिश्रण नष्ट करण्यात आले. या कारवाईत सुमारे ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, पाच जणांविरुद्ध रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर तालुक्यातील काही भागांत अवैधरीत्या हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची पडताळणी करून पोलिसांनी संबंधित ठिकाणी कारवाईचे नियोजन केले. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे, अमूल बच्छाव, पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन, संबंधित बीट अंमलदार तसेच डीबी पथकाने तालुक्यातील विविध भागांत धडक कारवाई केली. कारवाईदरम्यान पोलिस पथकाने अवैधरीत्या तयार करण्यात आलेली सुमारे ३४५ लिटर दारू नष्ट केली. यासोबतच हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे गूळ-मोह मिश्रणही नष्ट करण्यात आले. अवैध दारू निर्मितीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली असून, एकूण सुमारे ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी दीपक सुरेश भालेराव (कुसुंबा), बिस्मिल्ला चादखा तडवी (पाडला), कृष्णा मधुकर राठोड (पाल), सुपडू भिवसेन तावडे (नेहता) आणि असलम हसन तडवी (पाल) यांच्याविरुद्ध रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. रावेर पोलिसांच्या या कारवाईनंतर अवैध हातभट्टी दारू तयार करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तालुक्यात अशा प्रकारच्या अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, पोलिसांच्या कारवाईचे परिसरातील महिलांनी स्वागत केले आहे. अवैध हातभट्टी दारूमुळे कुटुंबांवर तसेच सामाजिक वातावरणावर होणारे परिणाम लक्षात घेता अशा प्रकारच्या कारवाया अधिक प्रभावीपणे आणि सातत्याने सुरू ठेवाव्यात, अशी मागणी महिलांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, रावेर तालुक्यातील खानापूर आणि आहिरवाडी परिसरातून देशी दारू मोठ्या प्रमाणावर मध्य प्रदेशात तस्करी केली जात असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. या कथित तस्करीकडे रावेर पोलिस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती चौकशी व कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound