Home क्राईम जारगाव चौफुलीवरील अतिक्रमणावर पोलिसांचा हातोडा; अवैध धंद्यांच्या तक्रारींनंतर पाचोरा पोलिसांची कारवाई

जारगाव चौफुलीवरील अतिक्रमणावर पोलिसांचा हातोडा; अवैध धंद्यांच्या तक्रारींनंतर पाचोरा पोलिसांची कारवाई

0
6

पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायत हद्दीतील जारगाव चौफुली परिसरात वाढलेले अतिक्रमण आणि अवैध धंद्यांच्या प्रकारांबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांनी ३ ऑक्टोबर रोजी अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे चौफुली परिसरातील वाहतुकीला आणि नागरिकांच्या सुरक्षित ये-जा करण्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

जारगाव चौफुली हा परिसर आजूबाजूच्या अनेक गावांना जोडणारा प्रमुख रहदारीचा मार्ग आहे. त्यामुळे या ठिकाणी दिवसभर नागरिक, वाहनचालक, शाळकरी विद्यार्थी आणि महिलांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, चौफुली परिसरात विविध प्रकारचे अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या.

यासोबतच परिसरात सट्टा, जुगार तसेच अवैध दारू विक्रीसारख्या प्रकारांबाबतही पोलिसांकडे तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिस्थितीची दखल घेत अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. कारवाईदरम्यान चौफुली परिसरातील अतिक्रमणे हटवून सार्वजनिक रहदारीचा मार्ग मोकळा करण्यात आला.

ही कारवाई पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके आणि पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी, पवन पाटील, शरद पाटील, अनिल पाटील, संदीप भोई, संदीप राजपूत, तुषार विसपुते यांच्यासह पाचोरा पोलीस स्टेशनची टीम सहभागी झाली होती.

पोलिसांच्या कारवाईनंतर जारगाव चौफुली परिसर काही प्रमाणात मोकळा झाला असून वाहतुकीस होणारा अडथळा कमी होण्यास मदत झाली आहे. दरम्यान, अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण होऊ नये, तसेच परिसरातील अवैध धंद्यांवरही सातत्याने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.


Protected Content

Play sound