जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कागदोपत्री अडचणींमुळे एका मुलाच्या जन्मदाखल्यावर असलेले वडिलांचे नाव बदलण्याचा प्रश्न अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता. मात्र, या प्रकरणाचा पाठपुरावा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पुढे सरकली आणि सुमारे दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर मुलाला त्याचे संगोपन करणाऱ्या वडिलांचे नाव कायदेशीर नोंदीत मिळाल्याची माहिती डॉ. नितु पाटील यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने पुनर्विवाह केला होता. पहिल्या पतीपासून असलेल्या मुलाचा सांभाळ तिच्या नव्या पतीने स्वतःच्या मुलाप्रमाणे केला. मात्र, मुलाच्या जन्मदाखल्यावर पूर्वीच्या वडिलांचे नाव असल्याने शाळेतील कागदपत्रांमध्येही तेच नाव कायम राहिले. त्यामुळे मुलाला सामाजिक व मानसिक अडचणी निर्माण होऊ नयेत आणि संगोपन करणाऱ्या वडिलांना त्याची कायदेशीर ओळख मिळावी, यासाठी कुटुंबाने नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू केली.

यासाठी नगरपालिका, संबंधित विभाग तसेच Child Adoption Resource Authority (CARA) यांच्याशी संपर्क साधण्यात आला. आवश्यक कागदपत्रे सादर करून शुल्कही भरण्यात आले. मात्र, प्रकरण दिल्ली स्तरावर प्रलंबित असल्याचे सांगितले जात असल्याने प्रक्रिया लांबत गेली. या कालावधीत कुटुंबाला वारंवार शासकीय कार्यालयांमध्ये पाठपुरावा करावा लागला.
दरम्यान, या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या डॉ. नितु पाटील यांनी २२ जुलै २०२६ रोजी जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती आणि आवश्यक कागदपत्रे पाठविल्याचे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, अवघ्या काही मिनिटांत जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला आणि संबंधित अधिकाऱ्याचा संपर्क उपलब्ध करून देण्यात आला.
त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची देवाणघेवाण, संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा आणि प्रशासकीय प्रक्रिया पुढे नेण्यात आली. पूर्वी अशा स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये न्यायालयीन प्रक्रियेची आवश्यकता भासत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, नियमांमध्ये झालेल्या बदलांनंतर संबंधित अधिकार जिल्हाधिकारी स्तरावर उपलब्ध झाल्याने प्रक्रिया सुलभ झाल्याचे डॉ. पाटील यांनी नमूद केले.
अखेर सुमारे दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर संबंधित मुलाच्या नोंदीत त्याचे संगोपन करणाऱ्या वडिलांचे नाव मिळाल्याचे सांगण्यात आले. या बदलामुळे मुलाला केवळ कागदोपत्री ओळख मिळाली नाही, तर कुटुंबालाही मोठा मानसिक दिलासा मिळाल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, या एका प्रकरणाच्या पाठपुराव्यानंतर जळगाव जिल्ह्यातील अशाच परिस्थितीत असलेल्या सुमारे १५ ते १६ कुटुंबांना या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन आणि त्याचा फायदा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे एका कुटुंबाच्या अडचणीपासून सुरू झालेला प्रशासकीय पाठपुरावा इतर कुटुंबांसाठीही मार्गदर्शक ठरल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणात सहकार्य करणारे जिल्हाधिकारी रोहन घुगे, त्यांच्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच जळगाव येथील संबंधित Child Adoption Unit मधील पदाधिकाऱ्यांचे डॉ. नितु पाटील यांनी आभार मानले आहेत. सरकारी कागदपत्रांच्या मागे एखाद्या कुटुंबाचे आयुष्य आणि मुलाचे भविष्य असते, त्यामुळे अशा प्रकरणांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
“हा केवळ कागदावरील नावाचा बदल नव्हता; एका मुलाला त्याच्या संगोपन करणाऱ्या वडिलांची ओळख मिळाल्याचा आणि कुटुंबाला मानसिक दिलासा मिळाल्याचा क्षण होता,” अशी भावना डॉ. नितु पाटील यांनी व्यक्त केली.



