Home Cities भडगाव पिचर्डे परिसरात कोरड्या दुष्काळाचे पंचनामे सुरू; महसूल विभागाकडून शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी

पिचर्डे परिसरात कोरड्या दुष्काळाचे पंचनामे सुरू; महसूल विभागाकडून शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी

0
17

पिचर्डे, ता. भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने तसेच पावसात पडलेल्या मोठ्या खंडामुळे भडगाव तालुक्यातील पिचर्डे व परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाकडून शेतशिवारात प्रत्यक्ष पाहणी करून कोरड्या दुष्काळाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे शासनाच्या मदतीकडे लक्ष लागले आहे.

महसूल विभागाच्या पथकाने पिचर्डे गावातील विविध शेतशिवारांना भेट देऊन खरीप पिकांची सद्यस्थिती जाणून घेतली. यावेळी पिचर्डेचे तलाठी योगेश पाटील, ग्रामसेवक रविंद्र शेळके यांच्यासह संबंधित विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून पिकांची स्थिती, पावसाचे प्रमाण आणि पावसातील खंड याबाबत माहिती घेत नुकसानीची पाहणी केली.

यावेळी पिचर्डे गावातील माजी पोलीस पाटील हेमराज महाजन, माजी उपसरपंच विनोद बोरसे, विजय महाजन तसेच शेतकरी सुनील पाटील, विकास महाजन, प्रमोद पाटील, अभिमन पाटील, मदन पाटील, अनिल महाजन, योगेश महाजन, भूषण येवले, अमोल पाटील, अक्षय येवले यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

यंदाच्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. विशेषतः सोयाबीन, कपाशी, ज्वारी यासह अन्य खरीप पिकांना पावसाअभावी फटका बसला आहे. काही शेतांमध्ये पिकांची वाढ खुंटल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

महसूल विभागाकडून करण्यात येणाऱ्या पंचनाम्यादरम्यान पिकांची सद्यस्थिती, पावसाचे प्रमाण, झालेल्या नुकसानीचे स्वरूप आणि उत्पादनावर झालेला परिणाम याची नोंद घेतली जात आहे. नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान, पिचर्डे परिसरातील शेतकऱ्यांनी पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांनुसार आर्थिक मदत, पीकविमा भरपाई आणि आवश्यक सवलती मिळाव्यात, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

 


Protected Content

Play sound