धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील सोनवद रोडवरील हनुमान मंदिराजवळून चोरीला गेलेले ७ लाख ५० हजार रुपये किमतीचे फोर्स कंपनीचे क्रुझर चारचाकी वाहन स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत शोधून काढले. या प्रकरणी यावल तालुक्यातील आडगाव येथील २५ वर्षीय रुपेश अशोक मराठे याला अडावद-धानोरा परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने वाहन चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी फिर्यादी यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या मोठ्या भावाच्या नावावर असलेले फोर्स कंपनीचे सिल्वर रंगाचे क्रुझर वाहन क्रमांक MH-४१-V-४१४० हे सकाळी १० ते दुपारी ४ वाजेच्या दरम्यान सोनवद रोडवरील हनुमान मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला पार्क करण्यात आले होते. या कालावधीत अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय वाहन चोरून नेले. या घटनेप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३३/२०२६ दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. वाहन चोरीचे प्रकरण गांभीर्याने घेत जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपीचा शोध घेण्याच्या तसेच चोरीचे वाहन हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी आणि अंमलदारांना तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या. तपास पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्याचबरोबर पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला.मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी रुपेश अशोक मराठे, वय २५ वर्षे, रा. आडगाव, ता. यावल, जि. जळगाव याला अडावद-धानोरा परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर चारचाकी वाहन चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेले फोर्स कंपनीचे सिल्वर रंगाचे क्रुझर वाहन क्रमांक MH-४१-V-४१४०, अंदाजे ७ लाख ५० हजार रुपये किमतीचे, हस्तगत करण्यात आले आहे. त्यामुळे चोरीच्या गुन्ह्यातील वाहन पोलिसांना परत मिळवण्यात यश आले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी धरणगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र चव्हाण, धरणगाव पोलीस ठाणे हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, चोपडा विभाग, सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड तसेच धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास केला. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्णू बिन्हाडे, दीपक माळी, रवींद्र पाटील, जितेंद्र चव्हाण, समाधान भागवत, जयदीप राजपूत तसेच पोलीस कॉन्स्टेबल सुमित बाविस्कर, किशोर भोई आणि विजय खैरनार यांचा समावेश होता. पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला.



