जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील शासकीय आयटीआयजवळील कचरा संकलन केंद्र स्थलांतरित करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आयटीआयजवळील कचरा संकलन केंद्र एका महिन्याच्या आत बंद करून टीबी सेंटर येथील नवीन कचरा संकलन डेपोमध्ये स्थलांतरित करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी टीबी सेंटर येथील सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
काही दिवसांपूर्वी ABVP तसेच गव्हर्मेंट आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी आयटीआयजवळील कचरा डेपो हटविण्याची मागणी करत आंदोलन केले होते. आयटीआय परिसरात कचरा संकलन केंद्र असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत हे केंद्र अन्यत्र हलविण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी मनपा आयुक्त आदित्य जीवने, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून एका महिन्याच्या आत सदर कचरा डेपो बंद करण्याचे आश्वासन दिले होते.

या आश्वासनानुसार टीबी सेंटर परिसरात उभारण्यात येत असलेल्या नवीन कचरा संकलन डेपोच्या कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी प्रकल्पाचे काम सुमारे ९५ टक्के पूर्ण झाले असल्याची माहिती संबंधित मक्तेदाराचे इंजिनिअर आणि मनपा इंजिनिअर यांनी पदाधिकाऱ्यांना दिली. उर्वरित पाच टक्के कामही येत्या काही दिवसांत पूर्ण करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
नवीन डेपोचे काम पूर्ण झाल्यानंतर आयटीआयजवळील कचरा संकलन केंद्र बंद करून तेथील कचरा संकलन प्रक्रिया टीबी सेंटर येथे स्थलांतरित करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा मनपा आयुक्त आदित्य जीवने यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार असल्याची माहिती उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या प्रश्नावर महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी कोणतीही तडजोड करणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. दिलेल्या मुदतीत आयटीआयजवळील कचरा संकलन केंद्र बंद करून नवीन ठिकाणी व्यवस्था सुरू करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून कार्यवाही केली जात असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या पाहणीप्रसंगी प्रकल्प प्रमुख योगेश वाणी, संबंधित ठेकेदारांचे इंजिनिअर तसेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूटचे पीएमसी कर्मचारी उपस्थित होते. नवीन कचरा संकलन डेपोचे उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर आयटीआय परिसरातील कचरा संकलन केंद्र प्रत्यक्षात कधी बंद केले जाते, याकडे आता विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
आयटीआयजवळील कचरा संकलन केंद्र हटविण्याच्या मागणीला प्रतिसाद देत टीबी सेंटर येथील नवीन डेपोचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण करून महिनाभराच्या मुदतीत आयटीआयजवळील केंद्र बंद करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती मनपा पदाधिकाऱ्यांनी दिली.



