जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची गंभीर आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन APL प्रवर्गातील पात्र शेतकरी कुटुंबांसाठी विशेष अन्नसुरक्षा व्यवस्था लागू करावी, या मागणीसाठी Movement for Peace and Justice for Welfare (MPJ)तर्फे राज्यभर निवेदन देण्यात आले. जळगावसह जालना, बुलढाणा, मुंबई, परभणी, नाशिक, येवला आणि इतर जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्याकडे मागण्या मांडण्यात आल्या.
MPJ, जळगावच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. सध्या शेतकरी कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने पात्र APL शेतकरी कुटुंबांतील प्रत्येक सदस्याला दरमहा ५ किलो मोफत धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शेतकरी कुटुंबांना अन्नधान्याचा लाभ सहज आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राशन दुकानांच्या माध्यमातून सोपी व पारदर्शक व्यवस्था लागू करावी, अशी मागणीही MPJने केली आहे. पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळताना अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने स्पष्ट आणि सुलभ कार्यपद्धती निश्चित करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच पात्र शेतकरी कुटुंबांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणी करण्यात आली. अन्नसुरक्षेशी संबंधित प्रश्नांवर लाभार्थ्यांना कार्यालयीन पातळीवर वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत आणि तक्रारींवर वेळेत कार्यवाही व्हावी, यासाठी सक्षम यंत्रणा आवश्यक असल्याचे MPJच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. जळगाव येथे निवेदन देताना MPJ महाराष्ट्रचे राज्य उपाध्यक्ष महमूद खान, MPJ जळगाव जिल्हाध्यक्ष मुस्तकीम खान, जळगाव शहराध्यक्ष आदिल खान तसेच सदस्य शेख अनवर, शेख हुजैफा आणि शेख तबरेज उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे शेतकरी कुटुंबांच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेऊन मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
फैजपूर येथे प्रांताधिकारी यांनाही MPJच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बी. डी. महाले, अहमद सेठ मुल्लाजी, शहराध्यक्ष रहीमुद्दीन, मीडिया सेल सचिव साइम कुरैशी यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. विविध ठिकाणी प्रशासनाच्या प्रतिनिधींना निवेदन सादर करून APL शेतकरी कुटुंबांसाठी विशेष अन्नसुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. जळगावसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी निवेदन देण्याच्या माध्यमातून MPJने हा प्रश्न व्यापक पातळीवर प्रशासनासमोर मांडला आहे. APL प्रवर्गातील पात्र शेतकरी कुटुंबांना दरमहा प्रति व्यक्ती ५ किलो मोफत धान्य, राशन व्यवस्थेत पारदर्शकता आणि तक्रारींचे त्वरित निराकरण या प्रमुख मागण्यांवर शासनाने विचार करावा, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.



