अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सेवा संकल्प अभियान आणि सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने अमळनेर येथील सती माता मंदिर परिसरात माय भारत स्वयंसेवकांच्या वतीने प्लास्टिकमुक्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमातून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिकमुक्त परिसराचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
माय भारत अमळनेर तालुका स्वयंसेवक सागर कोळी यांच्या माध्यमातून या स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. मेरा युवा भारत, जळगावचे जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, रासेयो कार्यक्रमाधिकारी विजयकुमार वाघमारे आणि प्रा. अनिता खेडकर यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम पार पडला. या अभियानात समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी सती माता मंदिर परिसरातील प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या तसेच इतर कचरा संकलित करून परिसराची स्वच्छता केली. श्रमदानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्याचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून अधोरेखित केले. स्वच्छता अभियानादरम्यान परिसरातील नागरिकांमध्येही जनजागृती करण्यात आली. प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरणासाठी घातक ठरत असल्याने प्लास्टिकचा वापर टाळणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवणे याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले.

सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘स्वच्छ परिसर, सुंदर परिसर आणि प्लास्टिकमुक्त पर्यावरण’ असा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून सामाजिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या स्वच्छता अभियानात तेजस्विनी, अनुजा, जान्हवी, रत्ना, कीर्ती, मयुरी, जान्हवी माळी, सुमित, क्रिश, धम्मदीप, कल्पेश, दीपक, सुशील आणि राजेंद्र या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला.



