यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कृषीमित्र लोकनेते स्व. हरिभाऊ माधव जावळे यांच्या जयंतीचे औचित्य साधून भालोद येथे ‘आरोग्यावर बोलू काही…’ या विशेष उपक्रमांतर्गत आरोग्यविषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उपस्थितांना हृदय रोग व इतर गंभीर आजारांपासून कसे दूर राहावे याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभणार आहे.
मराठी विभाग, कला व विज्ञान महाविद्यालय भालोद (ता. यावल, जि. जळगाव) आणि ‘AVF Vision BSL’ यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दिनांक ०३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ०९ ते १० या वेळेत कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथील सभागृहात पार पडणार आहे. आधुनिक जीवनशैलीत वाढते आजार आणि आरोग्यविषयक समस्या लक्षात घेता नागरिकांमध्ये जागरूकतेचा संदेश देणे हा या व्याख्यानाचा मुख्य उद्देश आहे. या व्याख्यानात ‘हृदयरोग व इतर गंभीर आजार कसे टाळता येतील?’ या विषयावर भुसावळ येथील मानवतकर हॉस्पिटलचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राजेश मानवतकर हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर विशेष उपस्थित राहणार आहेत.




