Home करियर यावल येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ; २७७ उमेदवारांची नोंदणी, १०१...

यावल येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ; २७७ उमेदवारांची नोंदणी, १०१ जणांच्या मुलाखती

0
12

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकल्पनेतून युवकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी यावल येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या एकूण २७७ उमेदवारांनी नोंदणी केली, तर त्यापैकी १०१ उमेदवार विविध कंपन्या व संस्थांच्या मुलाखतीस सामोरे गेले.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. २९) या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सकाळी १०.४५ वाजता मेळाव्याचे आभासी पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा तसेच पणन मंत्री जयप्रकाश रावल यांनी मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी ४१८ ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आल्याचा उल्लेख केला. राज्यातील युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा अशा उपक्रमांचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या या उपक्रमांमुळे युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत होईल आणि ‘विकसित भारत २०४७’चे स्वप्न साकारण्यास हातभार लागेल, असे त्यांनी प्रतिपादन केले.

यावल येथे झालेल्या रोजगार मेळाव्यासाठी डिप्लोमा उत्तीर्ण ७, आय.टी.आय. उत्तीर्ण १४१, एस.एस.सी. व एच.एस.सी. उत्तीर्ण १०७ तसेच पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले २२ उमेदवार अशा एकूण २७७ उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी १०१ उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतींना उपस्थित राहून रोजगाराच्या संधी मिळविण्यासाठी सहभाग नोंदविला. मेळाव्यात सहभागी झालेल्या विविध कंपन्या व संस्थांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि अनुभवाच्या आधारे मुलाखती घेतल्या. ट्रेनी, फिल्ड वर्क, विमा प्रतिनिधी, बिझनेस ऑफिसर, रिसेप्शनिस्ट, सेल्स एक्झिक्युटिव्ह आदी विविध पदांसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे आय.टी.आय., बारावी तसेच पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या युवकांना त्यांच्या पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी जाणून घेण्याची आणि थेट कंपन्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक सुनील भोईटे होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रतिनिधी मोईनोद्दीन सय्यद, वैद्यकीय अधिकारी तसेच विविध शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावलचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. एस. आर. गायकवाड, आय.टी.आय., यावलचे प्राचार्य प्रा. पी. बी. पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. एच. जी. भंगाळे, प्रा. एम. डी. खैरनार आणि समन्वयक प्रा. इमरान खान यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पंकज बोदडे यांनी केले, तर केंद्र समन्वयक डॉ. बी. सी. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस. आर. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रोजगार मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound