हतनूर येथे राज्य राखीव पोलीस बल गट स्थापन करण्यास मंत्रीमंडळाची मंजूरी

srp

srp

जळगाव (प्रतिनिधी) पोलीस प्रशिक्षण केंद्र, हतनूर (वरणगाव) ता. भुसावळ येथे राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांच्या प्रयत्नाने राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 ची स्थापन करण्यास आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

 

याकरीता 1384 पदांची निर्मिती करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली. तसेच राज्य राखीव पोलीस बल गट निर्मितीसाठी अपेक्षित असलेल्या सुमारे एकूण 56.61 कोटी आवर्ती व 81.01 कोटी अनावर्ती खर्च मंजूर करण्यास राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 चे निर्मितीकरीता विविध संवर्गातील एकूण 1384 पदे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने कार्यकारी पदांमध्ये प्राचार्य-1, सहाय्यक पोलीस उप अधिक्षक-7, सहाय्यक समादेशक -3, पोलीस निरीक्षक -9, पोलीस उपनिरीक्षक -23, सहाय्यक पोलस उपनिरीक्षक 80, पोलीस हवालदार-160, पोलीस शिपाई 854 अशी एकूण 1173 पदे मंजूर करण्यात आली आहे. तर मोटार परिवहन विभागामध्ये एकूण 30 पदांना मान्यता देण्यात आलेली असून बिनतारी संदेश विभागामध्ये एकूण 68 पदांना मान्यता देण्यात आली आहे.

त्याचबरोबर अकार्यकारी पदांमध्ये वैद्यकीय अधिकारी, कार्यालयीन अधिक्षक, सहाय्यक लेखाधिकारी, लघुलेखक, वरिष्ठ व कनिष्ठ लिपीक अशा एकूण 22 पदांना मान्यता देण्यात आलेली आहे. तर या प्रशिक्षण केंद्रासाठी एकूण 127 विविध संवर्गातील वर्ग- 4 कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात आली आहे. अशाप्रकारे राज्य राखीव बलाच्या पोलीस प्रशिक्षण केंद्र, हतनूर-वरणगाव, ता. भुसावळ जि. जळगावसाठी एकूण 1384 पदे मंजूर करण्यात आली आहे.

प्रशिक्षण केंद्रासाठी निधीची तरतूद

राज्य राखीव बलाच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी एकूण 81 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून यामध्ये जमीनीसाठी रक्कम रुपये 3.55 कोटी, प्रशिक्षण केंद्र बांधकामासाठी रक्कम रुपये 7.66 कोटी, निवासस्थान बांधकामासाठी रक्कम रुपये 2.79 कोटी, मैदाने विकसित करण्यासाठी रक्कम 52 लक्ष, शस्त्रात्रांसाठी रक्कम रुपये 6.23 कोटी, दारूगोळासाठी रक्कम रुपये 1.16 कोटी, प्रशिक्षण केंद्राच्या वाहनांसाठी रक्कम रुपये 14.72 कोटी, रस्ते बांधकामासाठी रक्कम रुपये 15 कोटी व इतर अनुषंगीक बाबींसाठी रक्कम रुपये 30.00 कोटी असा एकूण 81.01 कोटी रुपयांचा अनावर्ती खर्चासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. तर आवर्ती खर्चासाठी रक्कम रुपये 56.61 कोटी असे एकूण 137.62 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.

राज्याचे जलसंपदा व वैद्यकिय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांच्या प्रयत्नातून अतिशय महत्वाकांक्षी असे हे प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले आहे. या नियोजित प्रशिक्षण केंद्रामुळे पोलीस विभागाची प्रशिक्षण केंद्राची प्रलंबित असलेली मागणी पुर्णत्वास येणार असून पोलीस विभाग अधिक बळकट होण्यास मोलाची मदत होणार आहे. त्याचबरोबर हे प्रशिक्षण केंद्र भुसावळ तालुक्याच्या विकासामधील मैलाचा टप्पा ठरणार आहे.

Protected Content