भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलीस हवालदाराच्या नावाने लाचेची मागणी करणाऱ्या एका खाजगी इसमावर जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. अमन जसबिंदर सनसोये (वय ३६, रा. दीपनगर, भुसावळ) असे संबंधित खाजगी इसमाचे नाव असून, याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय तक्रारदार व त्याच्या अन्य तीन सहकाऱ्यांविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलीस हवालदार महेश चौधरी यांच्या नावाने चौघांकडून प्रत्येकी २५ हजार रुपये, असे एकूण एक लाख रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप आहे.

या रकमेपैकी ५० हजार रुपये यापूर्वीच स्वीकारण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर उर्वरित ५० हजार रुपयांची पुन्हा मागणी होत असल्याने तक्रारदाराने ३ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तक्रारीनंतर त्याच दिवशी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान खाजगी इसम अमन सनसोये याने तक्रारदाराची भेट घेतली. पोलीस हवालदार महेश चौधरी यांच्यासाठी तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच स्वीकारण्यास त्याने संमती दर्शवल्याचे एसीबीने म्हटले आहे.
यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सापळा रचून अमन सनसोये याला ताब्यात घेतले. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७ (अ) अन्वये गुन्हा क्रमांक १८३/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथकात पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, हवालदार बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर, सचिन चाटे आणि राकेश दुसाने यांचा समावेश होता.
दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.



