Home Cities जळगाव पंढरपुरात ४ ऑक्टोबरला राष्ट्रीय केळी परिषद ; हमीभाव, पीकविमा, निर्यात अन् संशोधनावर...

पंढरपुरात ४ ऑक्टोबरला राष्ट्रीय केळी परिषद ; हमीभाव, पीकविमा, निर्यात अन् संशोधनावर होणार मंथन

0
15


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पंढरपूर येथे रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी चौथी राष्ट्रीय केळी परिषद आयोजित करण्यात आली आहे. केळी उत्पादक शेतकरी संघ (महाराष्ट्र राज्य) आणि अखिल भारतीय बनाना महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद वाखरी रोडवरील आनंदी विनायक मंगल कार्यालयात सकाळी ९ वाजता होणार आहे. हमीभाव, पीकविमा, नैसर्गिक आपत्ती, बाजारपेठ, प्रक्रिया उद्योग, निर्यात आणि केळी संशोधनासह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर परिषदेत सविस्तर चर्चा होणार आहे.

केळी उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी अतितापमान, वादळी वारे, गारपीट, अतिवृष्टी आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. त्यातच पीकविमा, बाजारातील दरातील चढ-उतार, उत्पादन खर्च, निर्यातीतील अडचणी आणि प्रक्रिया उद्योगाच्या मर्यादा यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय केळी परिषदेत शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आणि प्रश्नांवर चर्चा करून पुढील दिशा ठरविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. केळीला योग्य व स्थिर दर मिळावा यासाठी हमीभावाचा प्रश्न परिषदेत प्रमुखत्वाने मांडला जाणार आहे. तसेच पीकविमा योजनेतील अडचणी, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान आणि त्यावरील भरपाईची व्यवस्था यावरही चर्चा होणार आहे. केळीची देशांतर्गत बाजारपेठ अधिक सक्षम करण्यासोबतच निर्यात वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही विचारमंथन केले जाणार आहे.

केळीचा शालेय पोषण आहारात समावेश करण्याची मागणी, शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीओ) थेट मदत, केळी पिकाचा भाऊसाहेब फुंडकर योजनेत समावेश आणि केळी उत्पादकांसाठी विशेष आर्थिक पॅकेज या मागण्यांवरही परिषदेत चर्चा होणार आहे. याशिवाय केळी संशोधन केंद्राची स्थापना, देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय निर्यात बाजारपेठेचा विस्तार आणि केळी पिकासाठी स्वतंत्र शासकीय महामंडळ स्थापन करण्याच्या मागण्याही मांडल्या जाणार आहेत. परिषदेचे मार्गदर्शन केळी उत्पादक शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण करणार आहेत. अखिल भारतीय बनाना महासंघाचे मध्य प्रदेश राज्य अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांकडून केळी उत्पादन, व्यवस्थापन आणि निर्यातीशी संबंधित तांत्रिक मार्गदर्शनही या परिषदेत दिले जाणार आहे.

या परिषदेत शरद विस्पुते हे ‘जमिनीचे आरोग्य, अन्नद्रव्य व केळी रोग व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. प्रकाश सावंत ‘फ्रूट केअर व निर्यात व्यवस्थापन’ या विषयावर माहिती देणार असून सचिन वाघमोडे ‘केळी रोप लागवड व व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे केळी उत्पादकांना उत्पादनापासून ते निर्यातीपर्यंत विविध बाबींविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने राष्ट्रीय केळी परिषदेस उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण यांनी केले आहे. या परिषदेच्या आयोजनासाठी अतुलनाना माने पाटील, डॉ. हनुमंत चिकणे, किशोर चौधरी, उत्तम पाटील, राजेश नवाल, पंढरीनाथ इंगळे, सचिन कोरडे, महेंद्र पाटील, वैभव पोळ, पुरुषोत्तम सर्ज, धीरज पाटील, ओंकार पवार, नितीन चव्हाण, सागर रणदिवे, राहुल जाधव, रत्नाकर पाटील आदी पुढाकार घेत आहेत. राष्ट्रीय समन्वयक सचिन कोरडे यांनी ही माहिती दिली.


Protected Content

Play sound