Home Cities जळगाव नशिराबाद न्यू इंग्लिश स्कूलमध्ये एसआयटीची चौकशी

नशिराबाद न्यू इंग्लिश स्कूलमध्ये एसआयटीची चौकशी

0
9


नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नाशिक विभागात चर्चेत असलेल्या कथित बोगस शालार्थ आयडी प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती आता जळगाव जिल्ह्यातही वाढताना दिसत आहे. मंगळवारी (दि. २९) नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नाशिक येथील विशेष तपास पथकाने (एसआयटी) दाखल होत शाळेतील विविध कागदपत्रे व नोंदींची तपासणी सुरू केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास एसआयटीचे पथक नशिराबाद न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पोहोचले. त्यानंतर शाळेशी संबंधित विविध कागदपत्रे, नोंदी तसेच शालार्थ आयडी प्रकरणाशी संबंधित असल्याची शक्यता असलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत असल्याचे समजते. नाशिक विभागातील कथित बोगस शालार्थ आयडी प्रकरणाच्या अनुषंगाने विशेष तपास पथकाकडून विविध शाळांमध्ये चौकशी व कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. त्याच तपासाचा एक भाग म्हणून नशिराबाद न्यू इंग्लिश स्कूलमध्येही तपासणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील तपासाची व्याप्ती जळगाव जिल्ह्यात आणखी वाढल्याचे दिसून येत आहे.

याबाबत अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी नशिराबाद न्यू इंग्लिश स्कूल तसेच नशिराबाद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष योगेश पाटील यांच्याशी संपर्क साधण्यात आला. आपण सध्या बाहेरगावी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सध्या विविध शाळांमध्ये तपासणी सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून नशिराबाद न्यू इंग्लिश स्कूलमध्येही एसआयटीकडून तपासणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, एसआयटीकडून नेमकी कोणती कागदपत्रे तपासण्यात आली, कोणत्या नोंदींची पडताळणी करण्यात आली आणि या चौकशीतून काय निष्पन्न झाले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील पुढील बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound