


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नाशिक येथे झालेल्याआढावा बैठकीत रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलदादा जावळे यांनी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जोरदार आवाज उठवत ठामपणे विविध मागण्या मांडल्या. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीत पीक विमा, वीजपुरवठा, वीज बिलमाफी, पीक नुकसान आणि दुष्काळी परिस्थिती या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.
केळी पीक विम्यातील तफावत दूर करण्याची मागणी
जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी सन २०२५-२६ मधील पीक विमा भरपाईतील तफावत दूर करून शेतकऱ्यांना योग्य व न्याय्य भरपाई मिळावी, अशी आग्रही मागणी आमदार अमोल जावळे यांनी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीचा विचार करून विमा भरपाई निश्चित करण्यात यावी, अशी भूमिका त्यांनी बैठकीत मांडली.
कृषी पंपांचे लोडशेडिंग कमी करा
कृषी पंपांसाठी सुरू असलेले वीज लोडशेडिंग कमी करून शेतकऱ्यांना नियमित आणि सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणीही आमदार जावळे यांनी केली. वीजपुरवठ्याच्या प्रश्नामुळे शेतीच्या कामांवर परिणाम होत असल्याने या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
वीज बिलमाफीचा मुद्दाही लावून धरला
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वीज बिल माफ करावे तसेच साडेसात हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनाही वीज बिलमाफीचा लाभ मिळावा, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी केली.
जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी
पावसातील खंड आणि निर्माण झालेल्या पीक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित करावेत, अशी मागणीही त्यांनी जोरदार पणे शासनासमोर मांडली. पिकांचे नुकसान लक्षात घेऊन तातडीने पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली.
यासोबतच सिंचनासाठी पुरेसा पाणीपुरवठा, कृषी पंपांना नियमित वीज, पीक कर्ज उपलब्धता आणि विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ शेतकऱ्यांना मिळावा, याबाबतही आमदार जावळे यांनी संबंधित विभागांचे लक्ष वेधले.
रब्बी हंगामालाही बसणार फटका
यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे खरीप हंगाम हातातून गेला असतांनाच यामुळे रब्बीच्या पिकांना देखील फटका बसणार आहे. यामुळे शेतकरी नैराश्यात असून त्याला मदतीचा हात देण्याची आवश्यकता असल्याकडे देखील आमदार अमोल जावळे यांनी या बैठकीत लक्ष वेधले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ आढावा न घेता त्यावर ठोस आणि तातडीची कार्यवाही व्हावी, अशी भूमिका आमदार अमोल जावळे यांनी बैठकीत मांडली. संकटग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक मदत व दिलासा मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रभावी निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली.
बैठकीस कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.



