Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगर येथे राष्ट्रीय पोषण माह निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

मुक्ताईनगर येथे राष्ट्रीय पोषण माह निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

0
14


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महिला व बाल विकास विभाग, उत्तर नागरिक प्रकल्प भुसावळ, शहरी विभागातील सर्व अंगणवाड्यांच्या वतीने नागेश्वर मंदिर येथे ‘राष्ट्रीय पोषण महा २०२६’ अभियानानिमित्त विविध उत्साहवर्धक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पौष्टिक पदार्थांचे प्रदर्शन, ‘टाकाऊपासून टिकाऊ’ शैक्षणिक साहित्य, तसेच ‘माझी अंगणवाडी–माझी जबाबदारी’ या संकल्पनेवर आधारित अन्नघटकांपासून तयार केलेल्या आकर्षक कलाकृती मांडण्यात आल्या होत्या.
कार्यक्रमा दरम्यान बालकांनी विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली. दैनंदिन जीवनातील व्यायाम, संतुलित आहार आणि पोषणाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या विविध संदेशात्मक प्रतिकृती धान्य व उपलब्ध अन्नघटकांचा वापर करून अतिशय कल्पकतेने साकारण्यात आल्या होत्या. या माध्यमातून उपस्थितांना मनोरंजक पद्धतीने आरोग्यदायी शिक्षणाचे धडे देण्यात आले.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष सौ. देवयानी शिरसाट या उपस्थित होत्या. कार्यक्रमात डॉ. प्रणिता सरोदे यांनी शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने पोषणाचे महत्त्व विशद केले, तर प्रा. डॉ. प्रतिभा ढाके यांनी “पोषणयुक्त आहार, सशक्त भारताचा आधार” हा गुरुमंत्र देत दैनंदिन आहारातील पौष्टिक घटकांच्या योग्य वापराबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि उपस्थितांना पोषणविषयक प्रतिज्ञा दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बाल विकास अधिकारी श्री. विजय सिंग परदेशी यांनी केले, ज्यामध्ये त्यांनी अभियानाचा मूळ उद्देश स्पष्ट करत अंगणवाडी सेविकांच्या कार्याची व त्यांना येणाऱ्या आव्हानांची माहिती दिली. पर्यवेक्षिका श्रीमती प्रमिला पावरा यांनी पोषणाशी संबंधित तांत्रिक घटकांची माहिती दिली, तर अध्यक्षीय भाषणात सौ. देवयानी शिरसाट यांनी अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या उल्लेखनीय कार्याचे मनापासून कौतुक केले. या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सविता महाजन यांनी केले तर आभार अलका खैरनार यांनी मानले.

Protected Content

Play sound