Home Cities जळगाव जळगावात हायकोर्टाचे सर्किट खंडपीठ करा! कृती व संघर्ष समिती, वकील संघाची मागणी

जळगावात हायकोर्टाचे सर्किट खंडपीठ करा! कृती व संघर्ष समिती, वकील संघाची मागणी

0
26


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । उत्तर महाराष्ट्रातील पक्षकार, वकील आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी जळगाव येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट खंडपीठ स्थापन करण्यात यावे, या मागणीसाठी जळगाव (उत्तर महाराष्ट्र) मुंबई उच्च न्यायालय सर्किट खंडपीठ कृती व संघर्ष समिती आणि वकील संघाच्या वतीने जळगाव जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांना निवेदनाद्वारे मागणी सादर करण्यात आली. यावेळी आमदार राजू मामा भोळे यांनी कृती समितीला स्वतः जिल्हा न्यायालयात उपस्थित राहून निवेदन स्वीकारत या रास्त आणि न्याय्य मागणीला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.

जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील जनतेला उच्च न्यायालयातील सुनावणीसाठी मुंबई किंवा छत्रपती संभाजीनगर येथे मोठा खर्च आणि वेळ वाया घालवून प्रवास करावा लागतो. सर्वांना सुलभ आणि जलद न्याय मिळणे हा संविधानात्मक हक्क असून, नागपूर, छत्रपती संभाजीनगर व पणजीप्रमाणेच कोल्हापूर येथेही ऑगस्ट २०२५ पासून सर्किट खंडपीठ कार्यरत झाले आहे. याच धर्तीवर खानदेशची मध्यवर्ती जागा असलेल्या जळगाव येथेही सर्किट खंडपीठ सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे, ही भूमिका वकील संघाने मांडली.

आमदार राजू मामा भोळे यांनी कृती समितीचे निवेदन स्वतः न्यायालयात येऊन वकील बांधवांशी संवाद साधला. आगामी विधिमंडळ अधिवेशनात यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडून प्रश्न लावून धरण्याचे तसेच मुख्यमंत्री आणि विधि व न्याय विभागाकडे पाठपुरावा करून उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे अनुकूल शिफारस पाठवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

याप्रसंगी कृती व संघर्ष समितीचे प्रणेते व अध्यक्ष ॲड. संजयसिंग पाटील, भाजप कायदे आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड. महेश जोशी, संयोजक ॲड. विजय शर्मा, ॲड. अविनाश खडके, ॲड. संजय सपकाळे, ॲड. सचिन चव्हाण, ॲड. आनंद मुजुमदार, जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. राजेश गवई, ॲड. जहांगीर, ॲड. सागर चित्रे, ॲड. विक्रम शिंदे, ॲड. गोविंद तिवारी, ॲड. दीपक राज खडके, ॲड. पी. व्ही. सोनवणे, ॲड. योगेश वाणी, ॲड. भूषण सूर्यवंशी, सत्यजित पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ व कनिष्ठ वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound