


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील दोधे गावात घरात एकटी असलेल्या महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरण्याच्या उद्देशातून हा खून करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून गावात हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोधे येथील ललिताबाई वसंत पाटील या आपल्या पतीसह वास्तव्यास होत्या. गावात भंडाऱ्याचा कार्यक्रम असल्याने गावातील बहुतांश नागरिक तसेच महिला जेवणासाठी कार्यक्रमस्थळी गेले होते. ललिताबाई पाटील यादेखील भंडाऱ्याचे जेवण करून आपल्या घरी परतल्या होत्या.
यावेळी त्या घरात एकट्याच असल्याची संधी साधून एका इसमाने घरात प्रवेश करून त्यांच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात ललिताबाई पाटील यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटण्याच्या उद्देशाने हा हल्ला आणि खून झाला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र खुनामागील नेमके कारण आणि घटनाक्रम पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक हरिदास भोसले यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.
दरम्यान, मृत ललिताबाई वसंत पाटील यांचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. भरदिवसा घरात एकट्या महिलेचा खून झाल्याने दोधे गावासह रावेर तालुक्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.



