Home प्रशासन नगरपालिका यावल शहरात सुमारे १० कोटींच्या विकासकामांना मंजुरी ; लवकरच भूमिपूजन 

यावल शहरात सुमारे १० कोटींच्या विकासकामांना मंजुरी ; लवकरच भूमिपूजन 

0
34


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपरिषद हद्दीतील विविध भागांमध्ये नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित सुमारे दहा कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली असून, या कामांचे लवकरच भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील यांनी दिली. निवडणुकीपूर्वी नागरिकांना दिलेल्या विकासकामांच्या आश्वासनांचा सातत्याने पाठपुरावा करून ही कामे मंजूर करून घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मंजूर विकासकामांमध्ये शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, गटारी, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, व्यायामाच्या सुविधा तसेच शहर सुशोभीकरणाशी संबंधित विविध कामांचा समावेश आहे. सातोद रोड परिसरात पाण्याची टाकी उभारण्यासाठी २ कोटी २९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पंडितनगर येथे डांबरीकरणासाठी १५ लाख रुपये, कृष्ण तारानगर भागात डांबरी रस्ता व गटार बांधकामासाठी ६० लाख रुपये आणि बालाजी सिटी परिसरात रस्ता व गटार बांधकामासाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बाबानगर परिसरात गटार बांधकामासाठी ४० लाख रुपये, खिन्नीपुरा येथे गटार बांधकामासाठी २० लाख रुपये आणि बारी वाड्यात संत रूपलाल महाराज प्रवेशद्वार उभारण्यासाठी ८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. साने गुरुजी विद्यालयाच्या पूर्वेकडील नवीन प्रवेशद्वारासाठी १० लाख रुपये, विद्यालयात ओपन जिम उभारण्यासाठी ११ लाख रुपये आणि विद्यालयाच्या रंगकामासाठी २० लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे.

साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रवेशद्वाराचे बांधकाम ही नागरिकांची पूर्वीपासूनची मागणी होती. या मागणीचा मंजूर विकासकामांमध्ये समावेश झाल्याने विद्यालयाच्या प्रवेशद्वाराचा प्रश्न आता मार्गी लागणार असल्याचे नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील यांनी सांगितले. फैजपूर–चोपडा रस्त्यावरील डिव्हायडरच्या सुशोभीकरणासाठी १० लाख रुपये, शहरात शेतकरी दांपत्याचे शिल्प उभारण्यासाठी ८ लाख रुपये आणि अक्सा नगर परिसरातील डांबरीकरणासाठी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वाणी गल्लीतील गटार बांधकामासाठी २० लाख रुपये, तर पांडुरंग सराफ नगरातील डांबरीकरण व गटार बांधकामासाठी २५ लाख रुपयांचे काम मंजूर करण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शहरातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी शौचालये व मुतारी बांधण्यासाठी ९५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दगडूशेठ सोनार ते डॉक्टर देशमुख यांच्या घराजवळ गटार बांधकामासाठी १० लाख रुपये, मदिनानगर भागात रस्ता व गटार बांधकामासाठी ६० लाख रुपये आणि शहरातील तीन विविध ठिकाणी वॉटर एटीएम बसवण्यासाठी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

याशिवाय यावल शहरात इनडोअर जिम उभारण्यासाठी १५ लाख रुपये, वृक्षारोपणासाठी ५ लाख रुपये आणि कलाकार कट्टा तयार करण्यासाठी ५ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे. शहरातील कचरा संकलन आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुमारे २ कोटी रुपयांच्या मान्यतेचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. तसेच यावल शहर आणि तालुक्यातील नागरिकांसाठी शववाहिनी तसेच शहरातील नागरिकांसाठी शवरथ उपलब्ध करून देण्याच्या कामासाठी सुमारे ४० लाख रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. नगराध्यक्षांच्या माहितीनुसार, या विविध विकासकामांना मंजुरी मिळवून देण्यासाठी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल वसंतराव पाटील, सर्व सहकारी नगरसेवक तसेच नगरपालिका प्रशासनातील संबंधित अधिकारी व अभियंत्यांचे सहकार्य लाभले. प्रशासकीय पातळीवर आवश्यक समन्वय साधून कामांना मंजुरी मिळविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

विकासकामांसाठी निधी आणि प्रशासकीय मंजुरीच्या प्रक्रियेत सहकार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी, जळगाव, नगरविकास विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, मुख्याधिकारी, बांधकाम अभियंता, पाणीपुरवठा अभियंता तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नगराध्यक्षांनी आभार मानले. “निवडणुकीपूर्वी नागरिकांना दिलेल्या शब्दानुसार शहरातील आवश्यक विकासकामांना प्राधान्य देऊन त्यांचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन लवकरच करण्यात येणार असून, उर्वरित आवश्यक कामांसाठीही पाठपुरावा सुरू राहील,” असे नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील यांनी सांगितले.


Protected Content

Play sound