Home क्राईम मुक्ताईनगरमध्ये प्रतिबंधित ‘गुटख्याची’ची अवैध विक्री नि साठवणूक ; कठोर कारवाईची मागणी

मुक्ताईनगरमध्ये प्रतिबंधित ‘गुटख्याची’ची अवैध विक्री नि साठवणूक ; कठोर कारवाईची मागणी

0
22


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरात प्रतिबंधित असलेल्या “विमल” तंबाखूजन्य व पानमसाला स्वरूपाच्या पदार्थांची सर्रासपणे आणि उघडपणे विक्री सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शहरातील काही संशयित दुकानांमधून या मालाची उघड्यावर विक्री केली जात असून, यामागे आंतरराज्यीय मोठी साठवणूक आणि वितरण साखळी कार्यरत असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अमोल बोदडे यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून, याप्रकरणी तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मुक्ताईनगर शहरात अंदाजे ३ ते ४ प्रमुख दुकानांमध्ये या तंबाखूजन्य पदार्थांची पाकिटे फोडून सुट्या आणि खुल्या स्वरूपात पुड्या बनवून विक्री केली जात आहे. हा संपूर्ण व्यवहार अत्यंत छुप्या आणि संशयित मार्गाने चालत असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार केवळ किरकोळ विक्रीपुरता मर्यादित नसून, दररोज कोट्यवधी रुपयांचा माल गोदामांमध्ये साठवून ठेवला जात आहे. या मालाची मध्य प्रदेशातून मोठ्या वाहनांद्वारे बेकायदेशीर वाहतूक केली जाते आणि मुक्ताईनगर हे त्याचे मुख्य केंद्र बनवण्यात आले आहे. येथूनच पुढे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये या प्रतिबंधित साहित्याचा पुरवठा केला जात असल्याचा गंभीर आरोप तक्रारदाराने केला आहे.

मध्य प्रदेशातून वाहनांद्वारे आणलेला हा साठा मुक्ताईनगर येथे उतरवून तेथून पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, खामगाव, जालना, बीड, अकोला आणि अमरावती यांसारख्या अनेक प्रमुख जिल्ह्यांत दररोज पाठवला जात आहे. तक्रारीत नमूद केलेले हे सर्व दावे तपासात खरे आढळल्यास, हा केवळ एका शहरातील किरकोळ विक्रेत्यांचा गुन्हा नसून, संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेले आंतरराज्यीय अवैध वितरणाचे मोठे नेटवर्क असल्याचे उघडकीस येईल. त्यामुळे पोलिसांनी आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केवळ स्थानिक दुकानदारांवर कारवाई करून प्रकरण थांबवू नये, तर या साखळीच्या मुख्य सूत्रधारांपर्यंत आणि पुरवठादारांपर्यंत तपासाची चक्रे फिरवावीत, अशी ठाम भूमिका बोदडे यांनी घेतली आहे.

या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता संबंधित दुकानांवर व संशयित गोदामांवर अचानक छापे टाकावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या उत्पादनांचे नमुने त्वरित अधिकृत प्रयोगशाळेत पाठवून त्यात तंबाखू, निकोटीन किंवा इतर आरोग्यास घातक असलेले प्रतिबंधित घटक आहेत का, याची रासायनिक तपासणी करण्यात यावी. यासोबतच दुकानांमधील प्रत्यक्ष साठा, खरेदी-विक्रीची बिले, स्टॉक रजिस्टर, ई-वे बिल तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या संशयित वाहनांची सखोल तपासणी करण्याची मागणी तक्रारदाराने प्रशासनाकडे केली आहे.

या संपूर्ण प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाच्या संशयास्पद भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तक्रारीनंतर आता प्रशासन प्रत्यक्ष काय पावले उचलणार, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. केवळ कागदोपत्री उत्तरे देऊन किंवा दिखाऊ कारवाई करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करू नये, तर करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर मुद्देनिहाय अहवाल जाहीर करावा, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. जप्त केलेला माल, प्रयोगशाळेत पाठवलेले नमुने आणि निष्पन्न झालेले निष्कर्ष यांची लेखी माहिती देण्याचे आव्हान दिल्याने आता प्रशासकीय यंत्रणेच्या पुढील कारवाईकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


Protected Content

Play sound