Home क्राईम रावेर गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाचा वाद ; १२७ नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारवजा अपील

रावेर गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाचा वाद ; १२७ नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारवजा अपील

0
5


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पारंपरिक मार्गावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सुमारे १२७ नागरिकांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे तक्रारवजा अपील सादर केले. अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी ९ सप्टेंबर २०२६ रोजी नवीन मिरवणूक मार्गाला दिलेल्या परवानगीचा तातडीने पुनर्विचार करून, कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता पूर्वीपासून प्रचलित असलेला पारंपरिक मार्ग कायम ठेवावा, अशी मागणी करण्यात आली.

जळगाव जिल्हा एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांच्या नेतृत्वाखाली रावेर येथील नागरिकांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. यावेळी अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी स्थगित किंवा रद्द करावी आणि मिरवणुकीसाठी दीर्घकाळापासून वापरात असलेला मार्ग निश्चित करावा, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली. निवेदनात पोलीस मॅन्युअलमधील धार्मिक मिरवणुकांशी संबंधित कायदा-सुव्यवस्थेच्या तरतुदींचा संदर्भ देण्यात आला आहे. उपलब्ध अधिकृत नोंदी, पूर्वीची कायदा-सुव्यवस्था परिस्थिती आणि मिरवणूक मार्गाबाबत यापूर्वी झालेले निर्णय यांचा सखोल पुनर्विचार करूनच अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली. रावेर पोलीस ठाण्यातील एफआयआर क्रमांक ३८९/२०२५, दिनांक ७ सप्टेंबर २०२५ तसेच तत्कालीन पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या संबंधित पत्राचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांतील परिस्थितीत नेमका कोणता वस्तुनिष्ठ बदल झाला आणि त्या आधारावर यंदा नवीन मार्गाला परवानगी देण्यात आली, याची पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

२० सप्टेंबर २०२६ रोजी रावेर परिसरात गणपती विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर दगडफेकीची घटना घडल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे. पारंपरिक मार्गाऐवजी नवीन मार्गाने मिरवणूक जात असताना ही घटना घडल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे. या घटनेनंतर परिसरातील कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशीलता वाढल्याने, आधी देण्यात आलेल्या मार्गाच्या परवानगीचा तातडीने पुनर्विचार करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

नवीन मार्गासाठी पोलीस प्रशासनाने दिलेल्या ना-हरकतीचा आधार काय होता, कोणत्या नोंदी आणि अहवालांचा विचार करण्यात आला, याचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली. एफआयआर क्रमांक ३८९/२०२५, तत्कालीन पोलीस अधीक्षकांचे पत्र, मागील वर्षांतील मिरवणुकांच्या नोंदी, ना-हरकत प्रमाणपत्राचे आवक-जावक क्रमांक तसेच संबंधित संपूर्ण फाइल ट्रेल तपासावी, असे नागरिकांनी म्हटले आहे. याशिवाय अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी परवानगी देताना वापरलेल्या Delegation of Power चे स्वरूप आणि त्यासंबंधित संपूर्ण फाइल तपासून आदेशाची वैधानिकता स्पष्ट करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून संबंधित अहवाल मागवून त्याची पडताळणी करण्यात येईल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे आता प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे रावेरवासीयांचे लक्ष लागले आहे. जळगाव जिल्हा एकता संघटनेचे फारुक शेख यांनी स्पष्ट केले की, गणेशोत्सव किंवा शांततापूर्ण धार्मिक मिरवणुकीला विरोध करणे हा निवेदनाचा उद्देश नाही. समान कायदा, समान निकष, दीर्घकाळ चालत आलेली प्रथा, सार्वजनिक सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था या मुद्द्यांवर प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी संघटनेची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

दीर्घकाळ प्रचलित असलेला मिरवणुकीचा मार्ग बदलून संवेदनशील परिसरातून नवीन मार्ग उपलब्ध करून दिल्यास भविष्यात इतर धार्मिक मिरवणुकांच्या मार्गांबाबतही वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचे शेख यांनी निवेदनात नमूद केले. त्यामुळे तात्कालिक परिस्थितीऐवजी दीर्घकालीन कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा लक्षात घेऊन प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या परवानगीची अंमलबजावणी स्थगित किंवा रद्द करावी, २० सप्टेंबरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नव्याने कायदा-सुव्यवस्था जोखीम मूल्यांकन करावे, एफआयआर क्रमांक ३८९/२०२५ आणि संबंधित तत्कालीन पोलीस अधीक्षकांच्या पत्राचा पुनर्विचार करावा, तसेच दीर्घकाळापासून प्रचलित आणि सुरक्षित मार्गाबाबत कारणासहित आदेश पारित करावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

या तक्रारवजा अपीलाच्या प्रती पोलीस अधीक्षक, जळगाव; विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र; विभागीय आयुक्त, नाशिक विभाग; पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई; उपविभागीय दंडाधिकारी, पाचोरा; पोलीस निरीक्षक, रावेर; महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग, मुंबई आणि महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग, मुंबई यांच्याकडेही देण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. शिष्टमंडळात आसिफ मोहम्मद दारा, इरफान खान, अल्ताफ खान, शेख शाकीर, जावेद खान, शेख कलीम, मोहम्मद साबीर, मलक रहमान, शेख सलीम, मोहम्मद अमीन, शेख फहिमोद्दीन, एजाजोद्दीन शेख यांच्यासह रावेर येथील सुमारे १२७ नागरिक सहभागी झाले होते. जळगाव एकता संघटनेतर्फे फारुक शेख, हाफीज रहीम पटेल, आरिफ देशमुख, मझहर खान, अनिस शहा, अमीन शेख, रज्जाक पटेल, राजू पटेल, मौलाना गुफरान आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound