


नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने आणि आयुष्मान आरोग्य मंदिर, नशिराबाद अंतर्गत आयोजित विशेष आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘उंच आड गणेश मंडळ’ येथे ‘श्री गणेशा आरोग्य अभियान’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत घेण्यात आलेल्या या शिबिरात ३० वर्षांवरील नागरिकांची बिगर-संसर्गजन्य आजारांच्या (NCD) अनुषंगाने मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या वेळी १२५ नागरिकांची रक्तदाब आणि रक्तातील साखरेची तपासणी करण्यात आली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या सूचनेनुसार आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे तसेच नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. शिबिरात १२५ नागरिकांची बीपी आणि शुगर तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान तीन नागरिकांना उच्च रक्तदाब असल्याचे निदान झाले. त्यांना पुढील उपचार व आरोग्यविषयक आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय इतर किरकोळ आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर मोफत औषधोपचार करण्यात आला. आरोग्य तपासणीसोबतच नागरिकांना निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. योगासने, संतुलित व राष्ट्रीय पोषण आहार याबाबत माहिती देण्यात आली. तसेच सध्याच्या ऋतूमध्ये पसरणाऱ्या जलजन्य आणि कीटकजन्य आजारांपासून नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबतही सविस्तर आरोग्य मार्गदर्शन करण्यात आले. डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.
या आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव भदादे, डॉ. स्नेहा कोलते आणि डॉ. अमन पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले. आरोग्य सेविका श्रीमती बफी साळुंके, आरोग्य सेवक श्री सुनील गोविंद ढाके, आशासेविका सुवर्णा पाटील आणि अरुणा पाटील यांनीही आरोग्य तपासणी व जनजागृतीच्या कामात योगदान दिले. शिबिराच्या व्यवस्थेसाठी मदतनीस शुभदा जैन तसेच १०२ रुग्णवाहिकेचे चालक राजेंद्र पाचपांडे यांनीही सहकार्य केले. आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध आरोग्यविषयक सेवा उपलब्ध झाल्या. या उपक्रमाला स्थानिक नगरसेवक मनोज चंद्रकांत पाटील यांच्यासह ‘उंच आड गणेश मंडळा’चे पदाधिकारी केशव खुशाल पाटील, विनोद चंद्रकांत पाटील आणि योगेश रमेश माळी तसेच मंडळाच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले. नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.



