Home Cities जळगाव जळगावात टपाल विभागाचा अनोखा उपक्रम ; गणेशोत्सवात नागरिकांसाठी विशेष ‘गणपती रात्र शिबिरांचे’...

जळगावात टपाल विभागाचा अनोखा उपक्रम ; गणेशोत्सवात नागरिकांसाठी विशेष ‘गणपती रात्र शिबिरांचे’ आयोजन

0
7


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गणेशोत्सवाच्या आनंदात नागरिकांना टपाल विभागाच्या विविध सेवा सहज व सोयीस्करपणे उपलब्ध व्हाव्यात यासाठी टपाल विभागाने एक कौतुकास्पद आणि अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. उत्सवाच्या काळात गणेश मंडळांच्या मंडपातच ‘विशेष गणपती रात्र शिबिरांचे’ आयोजन करण्यात येत असून, याद्वारे टपाल, आर्थिक आणि विमा क्षेत्रातील विविध सेवा नागरिकांपर्यंत थेट पोहोचवल्या जात आहेत.

या विशेष रात्र शिबिरांमध्ये नागरिकांसाठी स्पीड पोस्ट, नोंदणीकृत टपाल, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा, पोस्टल लाईफ इन्शुरन्स (PLI), ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स (RPLI) आणि पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स बँक (POSB) यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण सेवांची माहिती व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिली जात आहे. याशिवाय नागरिक-केंद्रित विविध शासकीय योजना आणि आधार कार्ड दुरुस्ती व नोंदणीशी संबंधित महत्त्वाच्या सेवा देखील सहभागी केंद्रांवर पुरवण्यात येत आहेत.

उत्सवाच्या काळात रात्रीच्या वेळी गणेश दर्शन आणि मंडळांना भेटी देणाऱ्या नागरिकांना टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी या शिबिरांमुळे मिळत आहे. नागरिक बचत योजना, विमा संरक्षण, पार्सल सेवा आणि टपाल विभागाच्या इतर आधुनिक उपक्रमांबाबत सविस्तर मार्गदर्शन या ठिकाणी मिळवू शकत आहेत. उत्सवाच्या वातावरणात रात्रीच्या वेळी ही सुविधा उपलब्ध झाल्याने नोकरदार व व्यावसायिकांची मोठी सोय झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात या उपक्रमांतर्गत १८ सप्टेंबर रोजी अमळनेर येथील राजे संभाजी मित्र मंडळ येथे शिबिर पार पडले. तर आगामी १९ सप्टेंबर रोजी पाचोरा येथील बहेरपुरा युवा प्रतिष्ठान मंडळ, अष्टविनायक गणेश मंडळ तसेच जळगाव शहरातील प्रभात चौक गणेश मंडळ येथे या विशेष रात्र शिबिरांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी या रात्र शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन टपाल विभागातर्फे करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound