Home धर्म-समाज मुंजोबा देवस्थान अट्रावलच्या विकासासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर ; आमदार अमोल जावळे...

मुंजोबा देवस्थान अट्रावलच्या विकासासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर ; आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नांना यश

0
21


यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यातील मुंजोबा देवस्थान अट्रावल येथील परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी २ कोटी ३१ लाख ८९ हजार रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला असून त्याला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. रावेर-यावल मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे हा महत्त्वपूर्ण निधी उपलब्ध झाला असून, यामुळे अट्रावल, भालोद, चितोडासह संपूर्ण तालुक्यातील भाविक व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

दरवर्षी भरणाऱ्या अट्रावल यात्रेच्या वेळी तसेच इतर सण-उत्सवाच्या प्रसंगी येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल होतात. मात्र, सुविधांच्या अभावामुळे व अपुऱ्या जागेमुळे भाविकांना मोठी कसरत करावी लागत असे आणि अतोनात त्रास सहन करावा लागत असे. ही समस्या लक्षात घेऊन आमदार अमोल जावळे यांनी यात्रेदरम्यान होणारी तुफान गर्दी आणि भाविकांची गैरसोय गांभीर्याने घेतली. त्यांनी तत्परतेने शासनस्तरावर पाठपुरावा करून या तीर्थक्षेत्राच्या सुशोभीकरण व सोयी-सुविधांसाठी मोठा निधी मंजूर करून घेतला. या प्रशासकीय मान्यतेमुळे आता लवकरच भक्त निवास, रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व इतर आवश्यक विकासकामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे मुंजोबा मंदिराचे पावित्र्य जपले जाऊन या क्षेत्राला नव्या वैभवाची जोड मिळणार आहे. याशिवाय यावल येथील प्रसिद्ध ऋषीमुणी श्री व्यास महाराज मंदिराच्या कामासाठी देखील सुमारे ४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता, ज्याचे भव्य दिव्य काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक वारसा जपण्यासोबतच मतदारसंघातील तीर्थक्षेत्रांचा कायापालट घडवून आणल्याबद्दल आमदार अमोल जावळे यांचे सर्व स्तरातून विशेष कौतुक व अभिनंदन केले जात आहे.


Protected Content

Play sound